नवीन नांदेड : नवीन नांदेडातील वसरणी येथे महात्मा फुले चौक ते नावघाट रस्त्यावरील धोकादायक विद्युत पोलमुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे़ हे पोल तात्काळ बदलण्याची मागणी प्रभाग ३६ चे नगरसेवक संजय मोरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे़ वसरणीतील महात्मा फुले चौकातील डी़ पी़ क्रमांक ४६३ सह नावघाट रस्त्याकडे जाणारे बहुतांश विद्युत पोल झुकले आहेत़ या पोलची अवस्था अशी झाली आहे की ते कधीही कोसळतील़ विद्युतप्रवाह सुरू असताना हा प्रकार घडल्यास अनेकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो़ पोल क्र ७३ व ७४ हे तर गंजलेल्या अवस्थेत आहे़ सध्या वादळीवारे आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे़ अशा परिस्थतीत धोका आणखीणच वाढला आहे़ वसरणी भागातील शंकरनगर, रहिमपूर भागात अनेकांना दिलेली वीजजोडणी ही बर्याच अंतरावरील पोलवरून देण्यात आली आहे़ या भागात नवीन पोल टाकण्यात यावेत अशी मागणीही नगरसेवक मोरे यांनी केली आहे़ वसरणीतील झुकलेल्या पोलबाबत यापूर्वीही महावितरणशी पत्रव्यवहार केला होता़ मात्र त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसत आहे़ हे धोकादायक पोल न बदलल्यास महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयासमोर १५ मे पासून उपोषण करण्याचा इशाराही नगरसेवक मोरे यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)
धोकादायक विद्युत पोलमुळे जीवितास धोका
By admin | Updated: May 9, 2014 00:30 IST