महावीर जयंती साजरी
निवघा - भगवान महावीर यांची जयंती निवघा परिसरात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भगवान महावीर यांचा अभिषेक आणि शांतीधारा करण्यात आल्यावर कोरोना दूर होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त समाजबांधवांनी दाराजवळ दिवा लावला आणि आनंद द्विगुणित केला.
रिमझिम पाऊस
मुक्रमाबाद - मुक्रमाबादसह परतपूर, देगाव, इटग्याळ, गोजेगाव, रावणकोळा, सावरमाळ, वंटगीर, रावी, हंगरगा, लखमापूर, कोटग्याळ, आंबेगाव आदी गावांत वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. सोमवारी हा प्रकार घडला. नेहमीप्रमाणे वीज गुल झाली. पावसामुळे आंबा, टरबूज, पपई, खरबूज, टोमॅटो, वांगी आदींचे नुकसान झाले.
हनुमान जयंती साजरी
देगलूर - शहरापासून ५ कि.मी. अंतरावरील मिर्झापूर येथील प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भजन, काकडा आरती आदी कार्यक्रम झाले. मदनूरचे तहसीलदार व्यंकटराव, विश्वस्त मंडळाचे चेअरमन नरसीमलू गौड, सपाेनि व्यंकटराव, शीतल कुलकर्णी, मुख्य पुजारी अरविंद जोशी, सहायक पुजारी शैलेंद्र जोशी, मंदिर कर्मचारी कल्पना कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी धार्मिक विधी पार पाडले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
दोन दुकानांना आग
देगलूर - तालुक्यातील माळेगाव मक्ता किराणा दुकान व शेजारील एका इलेक्ट्रिकल दुकानाला अचानक आग लागली. आगीत दोन्ही दुकानांतील उपयाेगी वस्तू व रोख रक्कम जळून खाक झाली. जवळपास साडेसहा लाखांचे यात नुकसान झाले. अनिल पांचाळ व नंदकिशोर येरनाळे यांची ही दुकाने आहेत. २५ एप्रिलच्या रात्री ही आग लागली. आग विझवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.
बसवेश्वर जयंती साजरी
नांदेड - ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी येथे बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपसरपंच साहेबराव पाटील, अनिल धमने, रमेश तालीमकर, हणमंत मैलगे, आशीर्वाद डाकोरे, श्याम नायगावे, रामदास गजभारे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
टाकळगाव येथे फवारणी
लोहा - तालुक्यातील टाकळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. सरपंच भीमराव लामदाडे, उपसरपंच संभाजी चित्ताेरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव मोरे, ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे आदींनी याकामी पुढाकार घेतला. कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरपंचांनी केले आहे.