नांदेड : सायकल रिक्षावरुन मालवाहतूक करणाऱ्या मजुरावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्या नैराश्येतून शुक्रवारी सकाळी एका मजुराने नवीन पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी काही सजग नागरिकांनी लगेच या मजुराला रोखले. त्यानंतर समजूत घालून त्याला घरी पाठविण्यात आले. जुना मोंढा भागात सायकल रिक्षावर मालवाहतूक करुन अनेक मजूर आपली उपजीविका चालवतात. परंतु, लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास असाच एक मजूर सायकल रिक्षा घेऊन मोंढा भागातील नवीन पुलावर आला होता. यावेळी रस्त्याकडेला आपली रिक्षा उभी करुन पुलाच्या कठड्यावर चढून उडी मारणार, तोच हा प्रकार रस्त्यावरुन जाणाऱ्या काही सजग नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी धाव घेत या मजुराला खाली ओढले. त्यानंतर त्याची समजूत घालून आत्महत्येपासून त्याला परावृत्त केले. यावेळी पुलावर मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे मजुरांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे स्पष्ट होते.
नदीत उडी घेण्याच्या प्रयत्नातील तरुणाला वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST