शाळातील उपस्थिती वाढावी आणि लहान मुलांना सकस अन्न मिळावे या उद्देशाने शाळांमध्ये शालेय पोषण आहार ही योजना सुरू करण्यात आली. परंतु धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचेच त्यातून पोषण होत असल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत उघडकीस आली आहेत. त्यातच आता पोषण आहारात चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. कोसमेट येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्यूमर्स फेडरेशनकडून धान्य पुरवठा केला जातो. गावातील अनिल शिरफुले यांना या धान्याबाबत संशय आला. त्यांनी मुख्याध्यापकांना तसे पत्र दिले. २७ जुलै रोजी किनवट पंचायत समितीच्या सूचनेवरून उपसरपंच नागोराव बंकलवाड, शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय वाघमारे, अनिल शिरफुले, मारोती शेळके यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. तांदळाचे अडीचशे ग्रॅमचे नमुने पंचायत समिती किनवटला पाठविण्यात आले. तपासणीत हे निकृष्ट धान्य आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांच्याकडे केली आहे.
शालेय पोषण आहारात प्लॅस्टिकचा तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST