राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या आदिवासी भागातील आरोग्य परिस्थितीचा तसेच कुपोषण व कोरोना संदर्भात आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या तिसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य खात्यातील रिक्त जागा भरणे, पोषण आहार मुलांपर्यंत पोहचविणे, आजारी मुलांची विशेष काळजी घेणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. मराठवाड्याचे आदिवास भाग म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या किनवट व माहूर तालुका संबंधी या समितीचे सदस्य डॉ. बेलखोडे यांनी या भागातील प्रश्न मांडले. आदिवासी समाजात अंधश्रद्धा व गैरसमज जास्त प्रमाणात असल्यामुळे जनजागरण व समुपदेशन सारखे कार्यक्रम हातात घेणे तसेच गरजेेचे वैद्यकीय उपचारासाठी दीडशे किमी अंतर पार करावे लागत असल्याने किनवट व माहूर येथे तज्ज्ञांच्या उपचार सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रधान सचिवांना सांगण्यात आले. कुपोषण कमी करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र नांदेड येथे कागदोपत्री कार्यरत आहे. हे केंद्र किनवट येथे कार्यान्वित करून आदिवासी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या या बैठकीस आरोग्य खात्याचे सचिव व्यास, माता बाल संगोपन खात्याचे सचिव डॉ. अभय बंग, संचालक डॉ. तात्याराव लहाने, पाैर्णिमा उपाध्याय, ब्रायन लोबो, बंड्या साने, डॉ. अशोक बेलखोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर आदी उपस्थित हाेते.
किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST