नांदेड येथे उत्तम दर्जाचे विमानतळ असून या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध आहे. येथील गुरुद्वारामुळे जगभरातील भाविक मोठया प्रमाणात नांदेडला येत असतात. यापूर्वी नांदेडहून मुंबई, हैद्राबाद, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणी विमानसेवा सुरू होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीकाळ विमानसेवा पूर्णतः खंडित केल्यानंतर ट्रुजेट या कंपनीने हैद्राबाद-नांदेड-मुंबई व मुंबई-नांदेड-हैद्राबाद ही परतीची सेवा असलेली मंगळवार, बुधवार, गुरुवार या आठवड्यातील तीन दिवसांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली.
नांदेडमधील हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईला जाण्यासाठी दररोज विमान असले पाहिजे अशी आग्रही भूमिका पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली. त्यांच्याच पुढाकारातून आता आठवड्यातील उर्वरित चार दिवशी म्हणजेच सोमवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशीही नांदेडकरांना विमानाने मुंबईला जाता येणार आहे. चार दिवस नव्याने सुरू होणाऱ्या या विमानाने नांदेडच्या प्रवाशांना जळगाव आणि अहमदाबाद असाही प्रवास करता येणार आहे.
यापूर्वी सुरू असलेली ट्रुजेटची आठवड्यातील तीन दिवसांची विमानसेवा तशीच राहणार असून उर्वरित चार दिवसात ट्रुजेटचे विमान सकाळी ९.४५ वाजता अहमदाबादहून निघून जळगावला ११.५ मिनिटाला पोहोचणार आहे. ११.३० मिनिटानी जळगावहून निघून हे विमान १२.४५ मिनिटाला मुंबईला पोहोचेल. मुंबईहून १.२५ मिनिटाला निघणारे हे विमान नांदेड येथे ३ वाजता येईल.
नांदेड येथून ३.३० मिनिटांनी हे विमान मुंबईकडे रवाना होईल. मुंबई विमानतळावर ५ वाजता पोहोचून ५.३० वाजता जळगावकडे उड्डाण करेल. ७.०५ वाजता जळगावहून निघून रात्री ९.२५ मिनिटाला अहमदाबाद येथे विमान पोहोचेल.
या नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेमुळे दररोज मुंबईला जाण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे.