देगलूर (नांदेड) : धडकनाळ येथील पुलावरून कार व ऑटो अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेत तब्बल ४० तासांनंतर तिघांचे मृतदेह सापडले असून, एक महिला अजूनही बेपत्ता आहे. ही भीषण दुर्घटना १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती.
तालुक्यातील गवंडगावचा रहिवासी नारायण ईबिते व त्याचा मित्र महबूब पिंजारी कारने परतत होते. तर तेलंगणा राज्यातील जगत्याल येथील आसिफ शेख, शोएब खान, हसीना अब्दुल पाशा, समीना रशीद शेख व आफरीन अलीम शेख हे पाचजण ऑटोने घरी जात होते.
मध्यरात्री धडकनाळ पुलावर थांबलेल्या या दोन्ही वाहनांना अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने गाठले. त्यात कारमधील नारायण ईबिते व ऑटोतील आसिफ शेख, शोएब खान यांनी झाडावर चढून जीव वाचवला. मात्र महबूब पिंजारी (३३), हसीना अब्दुल पाशा (३२), समीना रशीद शेख (४५) व आफरीन अलीम शेख (३०) पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
शोधमोहीम सुरू असताना १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मुक्रमाबाद शिवारातील रावी परिसरात छोट्या नाल्यात तीन मृतदेह आढळून आले. त्यात महबूब पिंजारी, हसीना अब्दुल पाशा व समीना रशीद शेख यांचा समावेश आहे. मात्र आफरीन अलीम शेख यांचा अद्यापही शोध सुरू आहे.