छळास कंटाळून आणि माहेरी सोडल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील
जयभीमनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयभीमनगर येथे भाग्यश्री सतीश गायकवाड (वय २३) या विवाहितेला सासरच्या मंडळीनी घरकुल
बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण होत नसल्याने तिचा छळ करून तिला
माहेरी आणून सोडले. यामुळे विवाहिता भाग्यश्री गायकवाड हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी
लक्ष्मीबाई अंबादास सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.
विवाहितेस विष पाजण्याचा प्रयत्न
नांदेड- राहिलेले हुंड्याचे पैसे आणण्याच्या कारणावरून एका विवाहितेला विषारी द्रव पाण्यात टाकून
पाजण्याचा प्रयत्न हिमायतनगर तालुक्यातील सवना येथे घडला. याप्रकरणी हिमायतनगर ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. सवना येथे एका १९ वर्षीय विवाहितेला सासरी हुंड्याचे पैसे राहिल्याच्या
कारणावरून छळ केला जात होता. २७ मे रोजी सासू व नणंद यांच्या मदतीने पतीने विवाहितेला पाण्यामध्ये
विषारी द्रव टाकून ते पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून हिमायतनगर
ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक महाजन हे करीत आहेत.