उस्माननगर आणि सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. कंधार तालुक्यातील मौजे वाळकी येथे भगवान दिगांबर डोंगरे यांनी एम.एच.२६, बीएम २५८२ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. तर मौजे सारखणी येथे मोहम्मद अस्लम अब्दूल हमिद बानानी यांची एम.एच.२६, बीएल ४७०६ या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लांबविली. या प्रकरणात संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कुटुंब इफ्तारमध्ये चोरटे घरात
नांदेड- सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु असून सायंकाळच्या वेळी इफ्तार करण्यात येते. शहरातील गुलजार बाग गल्ली भागात कुटुंब इफ्तारच्या तयारीत असताना चोरट्याने घरात शिरुन ५१ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना २६ एप्रिल रोजी घडली.
म.अन्सार म.सरवर हे २६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास इफ्तारसाठी कुटुंबातील इतर सदस्यांसह घराच्या पहिल्या मजल्यावर गेले होते. यावेळी खालची खोली उघडीच होती. हीच संधी साधत चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी पर्समधील ५१ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. इफ्तार करुन परत आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.वाकडे हे करीत आहेत.
तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
शहरापासून जवळच असलेल्या पावडेवाडी भागात विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी घडली. बालाजी सदाशिव चन्ने असे मयताचे नाव आहे. एकनाथ पावडे यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात सदाशिव चन्ने यांच्या माहितीवरुन भाग्यनगर पोलिसांनी नोंद केली आहे.
गोरक्षणासाठी चारा दान करा
अर्पण, तर्पण आणि समर्पण हा भाव ठेवून गेल्या २५ वर्षापासून गोसंवर्धनाचे काम करणार्या प.पू.जगदिशबाबाजी यांच्या यांच्या खडकूत येथील गोशाळेत आजघडीला १२०० गायींचा समावेश आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन असल्यामुळे गायी चार्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनधी, लोकसेवक यांनी गायींना चारा पुरवावा असे आवाहन प.पू.जगदिशबाबाजी यांनी केले आहे.
खडकूत येथील शाळा गोधनासाठी वरदान ठरत आहे. गेल्या २५ वर्षापासून गोसेवा करतात. मार्च २०२० पासून लॉकडाऊन असल्यामुळे गायींची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. खाण्या-पिण्याची, औषधांची संपूर्ण काळजी जगदीश बाबाजी घेत आहेत. परंतु आता चारा कमी पडत आहे. त्यामुळे गोशाळेला चारा दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.