उघड्या डीपी धोकादायक
मुखेड : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीची डीपी खुल्या अवस्थेत असल्याने धोका निर्माण झाला. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गुटख्याची खुलेआम विक्री
कंधार : शासनाने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. संचारबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित
लोहा : तालुक्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये आधार प्रमाणीकरण केले नसल्याने कित्येक शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
फूल उत्पादकांना फटका
मुदखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे फूलशेती करणाऱ्या उत्पादकांना फटका बसला आहे. बाजारपेठेत दररोज ५०हून अधिक शेतकरी फुले विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजारात विक्रीचे बंधन असल्याने नुकसान होत आहे.
खताचा कृत्रिम तुटवडा
हिमायतनगर : तालुक्यात खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हवे असलेले खत मिळत नाही. कृषी विभागाने खताचा काळा बाजार रोखण्यासाठी समितीची स्थापना केली. मात्र या समितीने अद्याप एकही कारवाई केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खते मिळवताना चांगलीच धावपळ करावी लागत आहे.
हळदीची लागवड सुरू
हदगाव : तालुक्यातील शेतशिवारातील उन्हाळी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे अशांनी आपल्या शेतात हळद व भुईमूग लागवडीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांना या पिकावर आतापासूनच आशा लागली आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने हा पाऊस समाधानकारक रहावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात युवक जखमी
किनवट : राजगड तांडा ता. किनवट येथील गणेश चिंचोलकर या युवकावर रानडुकराने हल्ला केला. यात तो जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. खदानीत दगड फोडण्यासाठी गणेश गेला असताना खदानीत दबा भरून असलेल्या रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. त्याचा आरडाओरड ऐकून परिसरात काम करत असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेतल्याने रानडुक्कर पळून गेला. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात गणेशला दाखल करण्यात आले.
बरडशेवाळा परिसरात बुद्ध पौर्णिमा
हदगाव : तालुक्यातील बरडशेवाळा, पळसा, मनाठा, नेवरी, नेवरवाडी, उंचाडा, करमोडी, पिंपरखेड, चिंचगव्हाण येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. घराघरात, बौद्ध विहारात गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून बुद्ध पौर्णिमा साजरी झाली.
निर्जंतुकीकरण फवारणी
हिमायतनगर : शहरातील वॉर्ड क्र. ११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी स्वखर्चाने जंतुनाशक निर्जंतुकीकरण फवारणी केली. यावेळी शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड, डॉ.गणेशराव कदम, भोयर गुरुजी, मुन्ना शिंदे, दिलीप आरेपल्लू, आशिष चव्हाण, बालाजी पांचाळ, राम हेंद्रे, गजानन जाधव, इश्वर डांगे आदी उपस्थित होते.
नालेसफाई कामांना वेग
नायगाव : तालुक्यातील बळेगाव येथील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर गावातील अंतर्गत रस्ते, मजबुतीकरण व नालेसफाईच्या कामांकडे लक्ष दिले आहे. या कामांनी वेग घेतला. गावातील अनेक रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला. नाल्या, केरकचरा मातीदगडाने भरलेल्या होत्या. त्यांची साफसफाई करण्यात आली.
डेमो हाउसच्या कामाला सुरुवात
हिमायतनगर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाची कामे सुरू आहेत. तालुका पातळीवरील घरकुल कसे असावे यासाठी डेमो हाउसच्या कामाला सुरुवात झाली आहे. पंचायत समिती प्रांगणात रजिस्ट्री कार्यालयाच्या शेजारी डेमो हाऊस उभे करण्यात येणार आहे. आमदार जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बांधकामाचे साहित्यही येऊन पडले आहे.
सोयाबीनचा पेरा वाढणार
बारड : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीपेक्षा सोयाबीनवर भर दिल्याचे संकेत आहेत. कपाशीवर दरवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव पडत असल्याने उत्पादनात घट येत आहे. लावलेला खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यांनी यावेळी सोयाबीनकडे आपला मोर्चा वळविला. पेरणीचे नियोजन करताना कपाशी नको, अशी भूमिका घेतली आहे.
हायवा महसूलच्या ताब्यात
लोहा : बेटसांगवी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडण्यात आला. सध्या पेनूर, बेटसांगवी, गंगाबेट, धनगी, भेंडेगाव येथे चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरू आहे. २७ मे रोजी सकाळी बेटसांगवी शिवारात वाळू चोरून नेताना एक हायवा पकडण्यात आला.
कुंडलवाडी शहराध्यक्षपदी जिठ्ठावार
कुंडलवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुंडलवाडी शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी महंमद इस्माईल महंमद इब्राहीम यांची निवड झाली. तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील, गौसोद्दीन कुरेशी यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.
कर्जवाटपास विलंब
किनवट : उमरी बाजार येथील ग्रामीण बँकेत अपुरे कर्मचारी असल्यामुळे पीककर्ज वाटपास विलंब होत आहे. पावसाळा तोंडावर असतानाही कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागेल का अशी परिस्थिती आहे. बँकेच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन कर्मचारी वाढविण्याची गरज आहे.
पोलीस निवाऱ्याची दुरवस्था
नरसी : येथील चौकात असलेल्या कापडी निवाऱ्याची दुरवस्था झाली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मान्सून काही दिवसात दाखल होणार असून संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.