उमरी : तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने खासदार तसेच आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांना वार्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
उमरी तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, कोरोना साथरोगानंतर आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत अनेक कार्यकर्ते आमदार, खासदार व माजी आमदार यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयाभोवती घिरट्या घालत आहेत. मात्र, सध्या कोणतेही लोकप्रतिनिधी तसेच नेते या कार्यकर्त्यांना भेटत नसल्याचे विदारक चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणे, उमेदवारांची निश्चिती, प्रचार यंत्रणा, उमेदवारी अर्ज भरणे आदी प्रक्रियेसाठी, सल्लामसलतीसाठी तसेच आमदार-खासदारांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक कार्यकर्ते आतुर झाले आहेत. अशा परिस्थितीत या कार्यकर्त्यांना मात्र कोणीही थारा देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभा - विधानसभा निवडणुकीमध्ये हेच सामान्य कार्यकर्ते नेत्यांच्या निवडीसाठी अहोरात्र प्रचार करत होते. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्ताने याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कोणीही वाली नाही. ‘गरज सरो... वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागातील या कार्यकर्त्यांची कुणी साधी चौकशीही करत नाहीत वा जवळही घेत नाहीत. सध्या कुणीही सहकार्य करत नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.