केंद्र सरकारने प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली. सन २०२४ पर्यंत गरजवंताला घरकुल देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला जात आहे. परंतु उपलब्ध निधीतून घर बांधकाम करतांना आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याने राज्य सरकारने अशा योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे आदेश दिले आहेत.परंतु नायगाव तालुक्यातील बहुतांश लाभार्थ्यांना मागणी करून अद्यापही वाळू मिळाली नाही. त्यामुळे अनेकांची घरकुलाची कामे थांबली आहेत तर काही जणांची अर्धवट अवस्थेत आहेत.यासंदर्भात आ.राजेश पवार यांनी तालुका स्तरावरील यंत्रणेला अनेकदा सुचना केली तरीही यंत्रणेला जाग आली नाही. त्यामुळे याविषयी आ.पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत २२ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या पत्रातून नायगावच्या तहसीलदारांना उपरोधिक टीकाटिप्पणी करीत विविध प्रश्नांवर त्वरीत लेखी उत्तराची अपेक्षा करुन खरमरीत असे पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे घरकुल लाभार्थ्यांनी मोफत वाळू आता तरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्राला तहसीलदार काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
■तहसीलदारांना दिलेल्या पत्रातील ठळक मुद्दे. १.शासनाच्या या धोरणाबाबत आपणास माहिती आहे का?आपणास माहिती असल्यास आपणास ते धोरण मान्य नाही? का?आपणास मान्य नसल्यास याबाबतीत आपण आपल्या वरिष्ठांना कळविले का? २.आपण रेती देण्यास का? नकार देत आहात? ३.आपणास रेती देण्यास काही अडचणी आहेत का? ४.ही रेती जप्त केलेल्या घाटावरून द्यायची असताना सुध्दा याचा कोणत्याही प्रकारचा अधिकचा भुर्दंड आपल्यावर वैयक्तिकरित्या किंवा शासनावर येणार नसतानाही आपण टाळाटाळ का? करीत आहात? ५.आपणास तालुक्यातील गोरगरीब जनतेची घरे व्हावीत असे वाटत नाही? का? ६.रेती न देता आपणाकडे सदरील लाभार्थ्यांना चढ्या भावाने रेती घेण्याकरिता इतर काही पर्याय आहेत का? तसे असल्यास आम्हाला आणि शासनाला कळवावे.