डोल्हारी येथे घरफोडीची घटना
डोल्हारी : हिमायतनगर तालुक्यातील मौजे डोल्हारी येथे किरण शेषराव कदम यांनी बँकेतून नऊ हजार रुपये काढून आणले होते. ही रक्कम आणि आजीकडील तीस तोळे चांदीचे कडे त्यांनी बॅगेत ठेवले होते. २७ जुलै रोजी दुपारच्या वेळी पाठीमागून घरात शिरलेल्या आरोपीने ती बॅग लांबविली. याप्रकरणात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
कार घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना बिलोली तालुक्यातील मौजे माचनूर येथे घडली. याप्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा नोंद झाला.
मजुरावर चाकूने हल्ला
शहरातील गंगानगर भागात किरकोळ कारणावरून एका मजुरावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना २६ जुलै रोजी घडली. अनंत बाबाराव मोडके हा तरुण मित्र प्रदीप यांच्या मुलीस आकाश पाळण्यामध्ये बसविण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी आरोपीने मोडके यांना शिवीगाळ करून त्यांच्या पायावर चाकूने वार केला. यात मोडके यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पाण्याच्या वादातून शेतकऱ्याचे दात पाडले
हदगाव तालुक्यातील मौजे कोळी येथे शेतातील पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तिघांनी शेतकरी विश्वनाथ चौतमाल यांना मारहाण केली. या मारहाणीत चौतमाल यांचे दात पडले. या प्रकरणात हदगांव पोलिसांनी गुन्हा नोंदविला
सांगवीत जुगार अड्ड्यावर धाड
शहरातील सांगवी भागात एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एक लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २६ जुलै रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. आनंदा दशरथ तिडके यांच्या शेतात झोपडीच्या शेजारी जुगाऱ्यांनी डाव सुरू केला होता. पोलिसांनी या ठिकाणाहून रोख आठ हजार ६५० रुपये आणि तीन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला तर शिवाजीनगर हद्दीत कमलबाई किराणा दुकानाच्या समोर मटका नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून अडीच हजार रुपये जप्त केले.