नांदेड : नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत मिळणा-या नाल्यांचे घाण आणि नदीतील जलपर्णी काढून नदीपात्राचे शुद्धीकरण करण्यासाठी महापालिका आता तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे़ त्यासाठी शुक्रवारी मनपात प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांच्या उपस्थितीत शहरातील तज्ज्ञ मंडळीची बैठक घेण्यात आली़गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे़ गोदावरीत शहरातील सांडपाण्याचे १९ नाले थेट सोडण्यात येतात़ त्याचबरोबर नदीपात्रात वाढणारी जलपर्णीही मनपासाठी डोकेदुखी ठरत आहे़ त्यामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे़ गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे़ गोदावरीतील जलपर्णी काढण्याचे कामही वेगाने सुरु आहे़ त्यासाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय नेतेही पुढे आले आहेत़ दरम्यान, गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी महापालिकेने शहरातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणार आहे़ त्यासाठी शुक्रवारी प्रभारी आयुक्त काकडे यांनी शहरातील तज्ज्ञ मंडळींची बैठक घेतली़या बैठकीत गोदावरी पात्रात वाहणा-या नाल्याचे पाणी शुद्धीकरण करुन आवश्यक त्या ठिकाणी पुनर्वापर करणे व नव्याने अतिरिक्त मलवाहिनी टाकून दूषित पाणी गोदावरीत जाणार नाही़ तसेच नदीपात्रात वाढत असलेल्या जलपर्णींची वाढ थांबविणे़ तसेच समूळपणे नायनाट करता येईल का? याबाबत नागरिकांचा सल्ला घेण्यात आला़या बैठकीला डॉ़ व्यंकटेश काब्दे, आऱयु़पाटील, प्राचार्य डॉ़बी़यूग़वई, राघवेंद्र कट्टी, पर्यावरणतज्ज्ञ प्रा़बी़एस़सुरवसे, प्रा़ प्रकाश जाधव, हर्षद शहा, द़मा़रेड्डी, सुरेश जोंधळे, अभिजित पाटील, बिरबल यादव, संदीप छारवाल, महेंद्र देशपांडे, सौरभ साले, संधू, कलीम परवेज यांची उपस्थिती होती़
गोदावरी शुद्धीकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:14 IST