खरीप हंगाम २०२१ पूर्व नियोजनाच्या अनुषंगाने सोयाबीन बियाण्याचा बाजारातील संभाव्य तुटवडा लक्षात घेता घरगुती सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या नियोजनातील एक भाग म्हणजे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक असून, प्रात्यक्षिकासाठी ओल्या गोणपाटाचा वापर करून १०० बिया रुजविण्यात आल्या. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के व त्यापेक्षा जास्त असेल तर बियाणे परेणीसाठी योग्य आहे. अपवादात्मक परिस्थितीत ६० टक्केपर्यंत उगवण क्षमता असलेले बियाणेही त्याप्रमाणात मात्रा (पेरा) वाढवून पेरता येऊ शकते. तसेच औषधांची बीजप्रक्रिया करणे आणि जमिनीची सुपिकता निर्देशांक व शिफारशीनुसार द्यावयाची खताची मात्रा व वेळ याबद्दल माहिती देण्यात आली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ (रुंद सरी वरंबा) सारख्या नवीन पेरणी पद्धतीचा अवलंब करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या कृषी सहायक ए. एम. कास्टेवाड यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी सरपंच मंदाकिनी यन्नावार, उपसरपंच पार्वतीबाई बालाजी कदम व ग्रामपंचायत सदस्य गावातील शेतकरी संतोष कदम, किशोर कदम, गंगाधर कदम यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक पार पडले.