नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू असून वाडी येथे सध्या सुरू असलेली पाणीपुरवठा योजना ही सन २०११-१२ मध्ये करण्यात आलेल्या लोकसंख्येच्या सर्व्हेवर आधारित आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात वाडी बुद्रुकचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळजवळ ३५ हजारांच्या वर पोहोचली असल्याने अनेक भागांत योग्य पाणीपुरवठा होत नाही. परिणामी, वाडी बुद्रुक येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात यावी, यासाठी जवळजवळ ४० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकावी लागणार आहे. यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणीपुरवठा मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार सहा कोटी रुपये खर्च येणार असल्याने वाडी बुद्रुक येथील नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच प्रतिनिधी आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख पावडे यांनी पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. याच वेळी वाडी बुद्रुक येथील नागरिकांचे आरोग्य चांगले असावे, या अनुषंगाने सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठीही ८० किलोमीटर अंतराच्या बंदिस्त नाल्याचे बांधकाम होणे अपेक्षित आहे. डासांचे निर्मूलन व्हावे आणि डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, या अनुषंगाने बंदिस्त नाल्यांचे बांधकाम करणे अपेक्षित असल्याने या कामासाठी ४० ते ५० कोटी रुपये खर्च होणार असल्याने वाडी बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही पावडे यांनी पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी पाच कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करत असल्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यामुळे वाडी बु. येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेला लवकरच सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पावडेवाडीच्या वाढीव पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:23 IST