कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांचे नियमावलीकडे दुर्लक्ष झाले
लग्नसोहळ्यासह विविध निवडणुकांतही फिजिकल डिस्टन्सिंग नियमाकडे कानाडोळा
प्रादुर्भाव कमी झालेला नसताना शाळा सुरू करण्याचा प्रयत्न
भाजी मंडईसह बाजारपेठांत नागरिकांनी केलेली गर्दी
कोरोना तपासणीकडे नागरिकांबरोबर आरोग्य विभागाने केलेले दुर्लक्ष
नांदेड - कोरोनाच्या पहिल्या लाटेचा नागरिकांनी अत्यंत जबाबदारीने मुकाबला केला. त्यामुळेच या लाटेत फारसे नुकसान झाले नाही. मात्र दुसऱ्या लाटेमुळे मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी झाली. या लाटेत औषधीसह इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. आता दुसरी लाट निवळत असली तरी त्या लाटेला कारणीभूत असलेल्या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; अन्यथा त्याच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाटही अटळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केल्यानंतर जणू काही कोरोना संपला, अशा थाटात सर्वांचेच वर्तन सुरू झाले. हजारोंच्या उपस्थितीत लग्नसोहळे घेण्यात आले. त्याबरोबरच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकाही मोठ्या थाटात पार पडल्या. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन झाले. त्यातच रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या. या दरम्यान बाजारपेठेत गर्दी वाढली. दुसरीकडे तपासण्यांचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट थरकाप उडविणारी ठरली. पहिल्या लाटेत जिल्ह्यात २ हजार ३५९ बाधित आढळले होते. दुसऱ्या लाटेत हीच संख्या ८७ हजार १६१ वर गेली; तर मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. पहिल्या लाटेत ९४ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. दुसऱ्या लाटेत तब्बल १७९० जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळेच आता तिसरी लाट येऊ नये असे वाटत असेल तर सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
पालिकेच्या सहा पथकांची राहणार नजर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी महानगरपालिकेसह प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.
महापालिकेच्या वतीने शहरात नजर ठेवण्यासाठी सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रत्येक पथकात आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोराेना नियमांचे पालन न केल्यास दंडासह जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आणि पोलिसांचे संयुक्त पथक कार्यरत राहणार आहे.
पहिली लाट ४ ऑगस्ट २०२०
एकूण कोरोना रुग्ण २३५९
मृत्यू ९४
दुसरी लाट १ जून २०२१
रुग्णसंख्या ८७,१६१
मृत्यू १७९०