मौजे भक्तापूर येथे दुचाकी लंपास
देगलूर तालुक्यातील मौजे भक्तापूर येथे गंगाधर हानमंत कोरेगाव यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी आणि पाण्याची मोटार असे ३२ हजारांचे साहित्य लंपास करण्यात आले. ही घटना २४ जुलै रोजी घडली. या प्रकरणात देगलूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
झोपेत ऊस तोडीचे पैसे लांबविले
लोहा तालुक्यातील कारेगावजवळ पेट्रोल पंपावर झोपलेल्या दोघांच्या खिशातील ऊसतोडीचे ५० हजार रुपये आणि १५ हजारांचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना २६ जुलै रोजी घडली.
राजेभाऊ दत्ता तिडके रा. पिंपळवाडा ता. धारुर हे मित्र महादेव याच्यासोबत नांदेडकडे येत होते. रात्री उशीर झाल्यामुळे दोन वाजेच्या सुमारास कारेगाव जवळ ओम साई पेट्रोल पंपावर ते झोपले होते. यावेळी तिडके यांच्या खिशातील ऊस तोडीचे ५० हजार रुपये आणि महादेव यांच्या खिशातील मोबाईल लांबविण्यात आला. या प्रकरणात लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
किराणा दुकानाच्या मागे जुगार
किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे किराणा दुकानाच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. २५ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी चार हजार रुपये जप्त केले असून इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
अल्पवयीन मुलीचा जळून मृत्यू
स्वंयपाक करीत असताना गॅसचा भडका उडाल्याने गंभीररीत्या भाजलेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
सायली राजेश्वर सूर्यवंशी (१४) असे मयत मुलीचे नाव आहे. हदगाव तालुक्यातील आमगव्हाण येथे सायली ही २५ जुलै रोजी गॅसवर स्वयंपाक करीत होती. त्याचवेळी गॅसचा भडका उडाल्याने ती गंभीररीत्या भाजल्या गेली. उपचारासाठी तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.