सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. गणेशोत्सव, गौराईनंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे लागोपाठ मोठे सण आहेत. या सणाच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून विशेष ऑफर्स दिल्या जातात. त्यात एकावर एक फ्री, अमुक टक्के सूट यासह इतर बक्षिसांचा समावेश असतो. त्यामुळे कोणताही ग्राहक त्याकडे आकर्षित होतो. परंतु अशाप्रकारची ऑनलाइन खरेदी करताना अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण सायबर गुन्हेगारांनीही नागरिकांना आपल्याला जाळ्यात ओढण्यासाठी अशाच प्रकारच्या स्कीम तयार केल्या आहेत. नामांकित कंपन्यापेक्षाही अधिक आकर्षक सूट देऊन ते ग्राहकांना आपल्याकडे ओढतात. एखादे उत्पादन दाखवून त्याचे ऑनलाइन पेमेंट करण्यासही भाग पडतात. परंतु प्रत्यक्षात ते उत्पादन तर येतच नाही, उलट आपल्या बँक खात्याची संपूर्ण माहिती अगदी हुशारीने काढून घेऊन खाते साफ करतात. अशी प्रकरणे आता उघडकीस येत आहेत. सायबर सेलकडे काही जणांनी त्याबाबत तक्रारीही केल्या आहेत. त्यात नागरिकांनी कोणतीही खात्री न करता समोरच्या व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करणे, अकाउंटला पैसे पाठविणे असे प्रकार केल्याचे पुढे आले आहे. आगामी काळात हे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चौकट
खात्री करूनच खरेदी करा
सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु ऑनलाइन व्यवहार करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या बँक खात्याची माहिती घेण्यात येते. नंतर ते साफ करण्यात येते. त्यामुळे कोणताही व्यवहार गाफीलपणे करू नये. पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, सायबर सेल