ग्रामपंचायती उदासीन
कंधार - पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनाने प्रत्येक गावात सार्वजनिक विहीर खोदण्यासाठी भरीव अनुदान दिले. मात्र तालुक्यातील बोटावर मोजण्याएवढ्या ग्रामपंचायतींमध्ये सद्यस्थितीत विहिरींचे काम सुरू आहे. इतर ग्रामपंचायती विहिरी खोदण्यासाठी उदासीन असल्याचे चित्र असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मशागतीचे दर वाढले
हिमायतनगर - दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत असल्याने मशागतींची कामे करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रतिलिटर डिझेलचे दर ९२ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे मशागतींचे दरही १५ ते २० टक्क्याने वाढले आहेत. पारंपरिक शेतीबरोबरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे.
वाळूअभावी घरकुले रखडली
धर्माबाद - कोरोना संसर्गापाठोपाठ प्रशासकीय उदासीनतेमुळे शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुलांची कामे ठप्प आहेत. जिल्ह्यात वर्षभरात वाळू घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडले. दोन महिन्यांपूर्वी काही वाळू घाटांचे लिलाव झाले. त्यातही काही घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध झाली नाही. त्यामुळे बांधकामे बंद ठेवावी लागली. घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
विजेअभावी कृषीपंपांना फटका
बिलोली - उच्चदाब प्रणाली योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी पंपांना स्वतंत्र डीपी त्यांच्या जलस्त्रोतावर उभारून देण्यात येत आहे. त्यामुळे कृषी पंपांना येणाऱ्या समस्यातून सुटका मिळणार आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्यावतीने वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने कृषी पंपधारक त्रस्त झाले आहेत.
आरोग्य केंद्र परिसरात गवत
भोकर - तालुक्यातील विविध आरोग्य केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. गवत काढण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने लक्ष न देण्यात आल्यामुळे विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
वीज ग्राहक वैतागले
मुखेड - बाराहाळी महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या ढिसाळ कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. बाराहाळी परिसरात गेल्या चार महिन्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. बाराहाळी येथील बाजारपेठ मोठी असून, परिसरातील ४० ते ५० गावांतील गावकऱ्यांचा थेट संबंध येतो. दररोज विविध कामांसाठी हजारो जणांची वर्दळ असते.
चव्हाण यांचे स्वागत
उमरी - जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण उमरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, विजयकुमार उत्तरवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी हरिदास चव्हाण, मोहनराव पवळे, रामराव राठोड, श्रीपतराव पाटील, नामदेव सावंत, किशोर पबितवार, मनोज कुलकर्णी, दिगंबर सावंत, मनोज सावंत आदी उपस्थित होते.
चौघांवर कारवाई
हदगाव - उमरी जहांगीर (ता. हदगाव) येथे ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या चालकास चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना २९ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी शाम फिरंगे यांनी तक्रार दिली. त्यावरून आरोपी समीर शहा, शाकीर शब्बीर मौलाना, अलताफ खान, मुश्ताक कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
अर्धापुरात चोरी
अर्धापूर - येथील अमीर शेख सय्यद यांच्या कार्यालयात चोरी झाली. चोरट्यांनी संगणक साहित्य व नगदी १ हजार २०० रुपये असा एकूण १७ हजार २०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना ३० मे रोजी घडली. अर्धापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
होळकर जयंती साजरी
कामठा बु. - येथील ग्रामपंचायत कार्यालयात व खंडोबा मंदिर येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विश्वनाथ दासे, उपसरपंच रणजितसिंग कामठेकर, संतोष कपाटे, पं. स. उपसभापती अशोकराव कपाटे, संताेष कदम, श्रीराम पाटील, शंकर कंगारे, राजू निकम, संजय साखरे, सतीश व्यवहारे आदी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख होनराव निवृत्त
मुखेड - खरब खंडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन होनराव सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी शेटकार, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी राम भारती, केंद्रीय मुख्याध्यापक एच. पी. जायभाये, दिलीपराव किन्हाळकर, केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड, दीनदयाल बनसोडे आदींची उपस्थिती होती.
येळेगाव येथे वृक्षारोपण
अर्धापूर - रामजी सावते बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून येळेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती आनंदराव कपाटे, भाऊराव कारखान्याचे संचालक आनंदराव सावते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संभाजी सावते, संजय सावते यांनी परिश्रम घेतले.
अध्यक्षपदी हरडपकर
हिमायतनगर - नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी बालाजी हरडपकर, तर सचिवपदी विठ्ठल शिंदे यांची ३१ मे रोजी झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. कार्यकारिणी अशी - उपाध्यक्ष संदीप उमरे, शेख यासीन, कोषाध्यक्ष मारोतराव हेंद्रे, संघटक राहुल सर्जेराव, सदस्य श्यामसुंदर पाटील, शेख मोजमील, परमेश्वर पवार, रामदास हेंद्रे, भुजंगा बनसोडे, बंडू गायकवाड, अब्दुल रज्जाक, सागरबाई भालेराव.
अहिल्याबाई होळकर जयंती
भोकर - येथील ग्रामीण रुग्णालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मुंडे, डॉ. राजाराम कोळेकर, डॉ. अपर्णा जोशी, सत्यजित टिप्रेसवार, मनोज पांचाळ, रोहिणी भटकर, ज्योती शेंडगे आदी उपस्थित होते.
आगीत गोठे जळाले
हिमायतनगर - तालुक्यातील वळग खु. येथे आग लागून तीन गोठे जळाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आगीत जनावरांचा चारा, शेतीउपयोगी अवजारे, टीनपत्रे जळून खाक झाले.
तालुकाध्यक्षपदी पाटील
हदगाव - ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अंबाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश पाटील यांची निवड झाली. जिल्हाध्यक्षांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. लवकरच तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांचा मेळावा घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
भोई समाज सेना शाखा
उमरी - तालुक्यातील शिरूर येथे भोई समाज सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण मराठवाडा अध्यक्ष नागेश बट्टेवार यांच्याहस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष बालाजी गाडेवाड, शाखाध्यक्ष येरबा हुसेवाड, लिंगोजी डुबुकवाड, गणेश गाडेवाड, साहेबराव गाडेवाड, दासा पाटील आदींची उपस्थिती होती.