मनपाच्या स्थायी समितीची मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत १० विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील इतवारा, वजिराबाद आणि सिडको झोनच्या मलवाहिनीच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. प्रत्येक प्रभागासाठी महापालिकेने २९ लाख ९८ हजार ५०० रुपये खर्च करण्यासाठी मंजुरी दिली होती. परंतु त्यापेक्षाही कमी दराने काम करण्यास ठेकेदाराने मंजुरी दर्शविली. इतवारा झोनमध्ये २५ लाख ४८ हजार रुपये, वजिराबाद झोनमध्ये २६ लाख ९८ हजार रुपये आणि सिडको झोनमध्ये २६ लाख ९८ हजार रुपये वार्षिक देखभालीसाठीची तयारी दर्शविली होती. या निविदांना मंजुरी दिली.
नांदेड उत्तर झोनमधील क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १,२,३ मध्ये सार्वजनिक पथदिव्यांची दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीला एक महिन्यासाठी मुदतवाढ दिली. त्याचप्रमाणे नांदेड दक्षिणमध्येही क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४,५,६ मध्येही एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर तुरटी पुरवठा करण्याची निविदाही स्थायी समितीपुढे ठेवली होती. ११ हजार ७११ रुपये प्रति मेट्रिक टन दराने ही निविदा मंजूर करण्यात आली आहे. दुसरीकडे शहरातील ऐरणीवर आलेल्या पाणी प्रश्नावरही चर्चा झाली. जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपहाऊस येथील विद्युत मोटारींचे देखभाल दुरुस्तीसाठीही ३९ लाख २७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या निविदेलाही स्थायी समितीने मंजुरी दिली. कोरोना प्रादुर्भावामुळे ही सभा ऑनलाईन झाल्याचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले.