नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. दररोजची वाढती रूग्णसंख्या व होणारे मृत्यू पाहून माणसे घाबरत आहेत. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे तर नकोच परंतु बाहेरची वस्तूही घरात आणणे नको, असे म्हणून नागरिक सध्या जारचे पाणीसुद्धा घेण्यास भीत आहेत. गतवर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनाचे संकट आले होते. मात्र, त्यावेळेस नागरिकांनी कोरोनाची एवढी धास्ती घेतली नव्हती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र सर्वांनाच घाबरवून टाकले आहे. यंदाही मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना लाटेने जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. माणसे भीतीपोटी घराबाहेर पडत नाहीत. माणसे घरात जाण्यापूर्वी बाहेरच आंघोळ करत आहेत. अशावेळी बाहेरून आणलेली वस्तू स्वच्छ धुवून मगच घरात घेतली जात आहे. एरवी शुद्ध पाण्याचे जार उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विक्री होतात. परंतु, आता घरासमोर आलेले जार काेणीही घरात घेत नाहीत. हे जार वितरित करणारे वाहन अनेक ठिकाणी फिरून येत असल्याने त्यावर विषाणू तर नाहीत ना, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे अनेकांनी बाहेरचे पाणी बंद करून घरातल्याच पाण्याचा वापर सुरू केला आहे. तर काहीजण नळाचे पाणी गरम करून ते पिण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे शहरातील शुद्ध पाणी विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने याठिकाणी वितरित होणारे पाणी आता बंद झाले आहे.
चाैकट-
महापालिकेकडे पाच प्रकल्पांचीच नाेंद
नांदेड शहरात अधिकृत शुद्ध पाणी निर्मितीची केंद्र बोटावर मोजण्याएवढी असली तरी अनधिकृत केंद्र मात्र १ हजाराहून अधिक आहेत. दरवर्षी या पाणी केंद्रांवरून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जार विक्री होते. मात्र, मागील वर्षीपासून हा व्यवसाय मंदावला आहे. मागील पाच, सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने अनधिकृत शुद्ध पाणी केंद्र बंद करण्यासाठी कारवाई सुरू केली होती. शहरातील सहा शुद्ध पाणी केंद्र सील करण्यात आली होती.
चौकट-
कोरोनाचा कहर पाहून खूप भीती वाटत आहे. बाहेरची कोणतीही वस्तू वापरत नाही. जारसुद्धा आम्ही बाहेरचा घेत नाही. घरातील पाणीच पिण्यासाठी वापरत आहोत. - बाबाराव गालफाडे, सिद्धांतनगर, नांदेड.
चौकट-
नळाचे पाणी गरम करून आम्ही ते पिण्यासाठी वापरत आहोत. यापूर्वी आम्ही जारचे पाणी विकत घेऊन पित असे. मात्र, आता बाहेरून आलेल्या जारचे पाणी पिण्यास घरातले सर्वच नको म्हणत आहेत. - गणेश उफाडे, तरोडा खु.
चौकट-
मागील वर्षभरापासून आमचा व्यवसाय मंदावला आहे. ऐन उन्हाळ्यात काेरोनामुळेे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे दुकाने बंद असून, नागरिक जारचे पाणी विकत घेण्यास तयार नाहीत. - शिवराज इंगळे, सरपंचनगर.