नांदेड : गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून कोरोनामुळे सर्वच ठप्प आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तर वाहतूक व्यवस्थाही बंद होती. परंतु त्यानंतर हळूहळू निर्बंध उठविण्यात आले. सर्व व्यवहारही सुरू झाले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आमिषाला बळी पडून या मुली भविष्याचा कोणताही विचार न करता उंबरठा ओलांडत आहेत. पोलिसांकडून अशा मुलींसाठी शोधमोहीम राबविली जाते. परंतु त्यातील मोजक्याच मुली घरी परत येतात. इतर मुली फसवणुकीनंतर कुटुंबीयांशी संबंध तोडून टाकत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतात. त्यामुळे अशा मुलींचे योग्य समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.
उदाहरण १
मोबाइलमुळे आता एकमेकांशी संपर्क करणे सोपे झाले आहे. त्यातून एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. समोरचा व्यक्तीच आपले सर्वस्व असल्याचा गोड गैरसमजत होतो. त्यातून मुली घराबाहेर पळून जाण्याचा विचार करतात, परंतु असा विचार करताना त्या भविष्याबाबत सतर्क नसतात. त्याचा त्यांच्या आईवडिलांसह कुटुंबाला प्रचंड त्रास होतो.
उदाहरण २
मुली किंवा मुले वयात येत असताना त्यांच्यात वेगळे काही तरी करण्याची खुमखुमी असते. चित्रपटातील दृश्याप्रमाणे त्यांना घरातून पळून जाण्यात एक प्रकारचे थ्रील वाटते.