प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील जवराला आणि बुधवार पेठ या गावांतील आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाचे प्रसिद्ध ढेमसा हे आदिवासी नृत्य सादर केले होते. त्यामुळेच श्रीमती इंदिरा गांधी यांनी या दोन्ही गावांना भेटी देऊन त्याठिकाणीची संस्कृती, त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचा आणि सहभागी कलाकारांना भेटण्याचा मनोदय व्यक्त केला होता. इंदिरा गांधी येणार असल्याने त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर त्याभागात उतरावे म्हणून वन विभागाच्या जमिनीवर सन १९८० च्या दशकात रोजगार हमीच्या कामावरील मजुरांच्या साहाय्याने धावपट्टी तयार केली होती. पुढे काही कारणास्तव इंदिरा गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. नंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडीनंतर या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद केली. पुढे यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही आणि हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये उपेक्षित राहिले. खासदार हेमंत पाटील यांनी राजगड येथे भेट दिली होती. दरम्यान, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया) यांची भेट घेत विमानतळाची मागणी केली. हे विमानतळ कार्यान्वित झाल्यास विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, हिंगोली सोबतच आंध्र प्रदेशमधील अदिलाबाद, निझामाबाद, निर्मल या ठिकाणच्या जनतेला सोयीचे होईल तसेच गडचिरोली आणि किनवटमधील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राज्य राखीव जवानांच्या (सीआरपीएफ) तुकड्या उतरविण्यास उपयोग होऊ शकतो, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. सोबतच नांदेड-मुंबई आणि नांदेड-दिल्ली-पुणे ही विमानसेवा नियमित सुरू करावी, जेणेकरून याठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
४१ वर्षे जुन्या धावपट्टीचे विमातळात रूपांतर करावे, केंद्रीय वाहतूक मंत्र्यास खासदाराचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:14 AM