नागपूर : नंदनवन हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरात एका युवकाची हत्या करण्यात आली. मृत भांडे प्लॉट येथील रहिवासी २५ वर्षीय पीयूष रविराज टेंभेकर आहे. त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. आई नोकरीसाठी ती औरंगाबादला राहत होती. त्यामुळे पीयूष भांडेप्लॉट येथील त्याच्या आजीकडे राहत होता. आईवडिलांचा धाक नसल्याने पीयूष टवाळक्या करीत होता. व्यसनामुळे त्याने सहा महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती. व्यसनाधीन युवकांसोबत तो राहत होता. व्यंकटेशनगरातील नाग नदीच्या काठावर शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला. त्याला लाठ्याकाठ्यानी मारल्यानंतर, दगडाने वार क रून, ठार केले होते. नंदनवन पोलिसांना सूचना केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तपासादरम्यान पोलिसांना पीयूष हा नीलेश व शुभम यांच्यासोबत फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस त्याच्या खुनाचा तपास करीत आहे. शुक्रवारी पीयूषची आई नागपुरात पोहचली. वडिलांनंतर मुलगाही गेल्याने ती प्रचंड अस्वस्थ आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. मृत पीयूषच्या खुनातील दोन आरोपींना रात्री नंदनवन पोलिसांनी अटक केली. आरोपींची नावे शुभम हिंगणेकर (१९) व नीलेश हरडे (२३) आहे. पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता, मृत पीयूष हा नीलेशच्या बहिणीचे अपहरण करण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगितले. गुरुवारी रात्री पीयूष नशेत असताना नीलेशने शुभमच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर दगडाने वार करून त्याची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, सहा. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतल, उपनिरीक्षक योगेश इंगळे, हवालदार रमेश चिखले, किशोर मालोकर, प्रमोद वाघ, राजेश तितरमारे, सचिन गौरी, राजेश बिजवे, अभयर मारोडे , विजय जाने यांनी केली. (प्रतिनिधी)
नंदनवनमध्ये युवकाचा खून
By admin | Updated: March 21, 2015 02:51 IST