नागपूर : नवीन योजनांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सोबतच कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून तरुणाईला रोजगारक्षम बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. अखिल भारतीय माळी महासंघातर्फे मानेवाडा येथे आयोजित ‘उद्योजक क्रांती २०१५’ या महाराष्ट्र माळी उद्योजक विकास प्रदर्शन व संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने,अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे, माजी आमदार अशोक मानकर, सभापती रमेश सिंगारे, गिरीश देशमुख, उद्योगपती केशवराव यावलकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, महात्मा फु ले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी राज्य सरकारची सहकार्याची भूमिका आहे. याबाबतचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी उद्योजकांना प्रेरणा दिली. त्यांनी चांगल्या रूढी आणल्या. याच विचाराची आज समाजाला गरज आहे. काळाची गरज ओळखून पावले उचलण्याची गरज आहे. माळी महासंघाने प्रदर्शन व संमेलनाच्या माध्यमातून चांगला उपक्रम सुरू केला आहे. उद्योजकांना संधी उपलब्ध केली. यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी,असे आवाहन फडणवीस यांनी केले. महासंघातर्फे राज्याच्या इतर विभागात आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महात्मा ज्योतिबा फुले मोठे उद्योगपती होते. त्यांच्या संस्थेने राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारले. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी शंकरराव लिंगे यांनी केली. प्रदर्शनात विविध क्षेत्रातील १०६ उद्योजकांनी स्टॉल लावले होते. कृषी व उद्योगासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. राज्यात माळी समाजाची लोकसंख्या २.५० कोटी आहे. समाजाचे उत्पन्न वाढले तर राज्याचाही विकास होईल. यासाठी समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत अविनाश ठाकरे यांनी प्रास्ताविकातून मांडले. यावेळी उद्योगपती के.पी. राऊ त, किशोर कन्हेरे, नारायणराव बोबडे, निशिकांत भेदे, संभाजी पगारे, रवी पाटील, भानुदास बोरकर, प्रकाश बोबडे, रवींद्र आंबाडकर, प्रगती मानकर यांच्यासह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तरुणाईला रोजगारक्षम बनविणार
By admin | Updated: February 16, 2015 02:12 IST