लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : सिलिंडर आणण्यासाठी माेटारसायकलने जात असलेल्या तरुणास तिघांनी अडविले व त्यात जबर मारहाण करीत त्याच्याकडील २० हजार रुपये हिसकावून घेतले. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भारकस शिवारात नुकतीच घडली. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, एकास सूचनापत्र देऊन साेडले.
पूरणसिंग महिपाल सिंग, रा. प्रबुद्धनगर, असे जखमीचे नाव असून, आराेपींमध्ये सागर गजानन थेटे (२०, रा. भारकस), निखिल विठ्ठल नेहारे (२१, रा. सूरगाव, ता. सेलू, जिल्हा वर्धा) या दाेघांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. पूरणसिंग सिलिंडर आणण्यासाठी माेटारसायकलने जात हाेता. त्याच भारकस शिवारात माेटारसायकलवर आलेल्या तिघांनी पूरणसिंगच्या माेटारसायकलला कट मारला. त्यामुळे पूरणसिंगने त्यांना गाडी व्यवस्थित चालविण्याची सहज सूचना केली. त्यावर चिडलेल्या तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. एवढेच नव्हे तर, त्या तिघांनी पूरणसिंगजवळील २० हजार रुपये हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि ३९४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून सागर थेटे व निखिल नेहारे या दाेघांना अटक केली तर विधीसंघर्षग्रस्त बालकास सूचनापत्र देऊन साेडले, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस हवालदार अशाेक तरमाळे यांनी दिली.