खापरखेडा : उंबराच्या झाडावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) येथील वीज केंद्राच्या सुरक्षा भिंतीजवळ गुरुवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली. मृत व्यक्ती हा २४ वर्षांचा असून, त्याची ओळख मात्र पटू शकली नाही.
शुभम बाेरकर (२८, रा. चिचाेली-खापरखेडा, ता. सावनेर) हा पाेलीस ठाण्याकडून चिचाेलीकडे पायी जात असताना त्याला हा मृतदेह आढळून आला. पाेलीस ठाण्याच्या परिसरात मदनकर यांची पानटपरी असल्याने काही वेळात तेही घटनास्थळी पाेहाेचले. हा तरुण वीज केंद्राच्या भिंतीलगत असलेल्या उंबराच्या झाडाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याने शुभमने याबाबत परिसरातील नांगरिकांना व पाेलिसांना माहिती दिली. या झाडाशेजारी परवानाधारक स्वस्त धान्य दुकान आहे. पाेलीस उपनिरीक्षक मेश्राम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. झाडाच्या बुंध्याजवळ चपला आढळून आल्या असून, त्याच्या डाेक्याला गंभीर जखमा आहेत. खाली फांद्याही पडल्या हाेत्या. ताे फांद्या ताेडताना काेसळला असावा, अशी शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली. पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.