ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21 - येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांपैकी १३६ कैद्यांना त्यांच्या शिक्षेतून ३ महिन्यांची सूट मिळणार आहे. या कैद्यांनी योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना शिक्षेतून सुटीचा बोनस मिळणार आहे. आंतराष्टीय योग दिनाचे औचित्य साधून वर्षभरापूर्वी मध्यवर्ती कारागृहात एक योजना जाहिर करण्यात आली होती. त्यानुसार, जे बंदीवान योगाभ्यास करून परिक्षा पास करतील, अशांना त्यांना झालेल्या एकूण शिक्षेपैकी ३ महिन्यांची शिक्षा कमी करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. येथील कारागृहात ३५० बंदीवान नियमित योगाभ्यास करतात. त्यातील १३६ जणांनी योगाची परिक्षा पास केली आहे. पतंजली योग पीठा तर्फे ही परिक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या १३६ बंदीवानाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. शिक्षा माफीचा (३ महिन्यांच्या) कागदोपत्री अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षीत असल्याचे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी आज पत्रकारांना सांगितले.मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कारागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन बंदीवानांनी योगाची प्रात्यक्षीके सादर केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी उपरोक्त माहिती दिली. नेहमी दडपणात असलेल्या बंदीवानांना योगाभ्यासामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होऊ शकते,असा निष्कर्ष एका पाहणीतून पुढे आल्याचे ते म्हणाले. अनेक योगाभ्यासी बंदीवानांनी स्वत:चे अनुभव कथन करताना देसाई यांच्या या कथनाला दुजोरा दिला.
योगाभ्यासी कैद्यांना मिळणार शिक्षेत सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 20:13 IST