सुमेध वाघमारे
नागपूर : नात्यात लग्न केल्याने जन्माला येणारे मूल अपंग होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मेयोच्या ‘इएनटी’ विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात १४० कर्णबधिर मुलांमधील ६२ मुलांच्या आई-वडिलांचे नात्यात लग्न झाल्याचे पुढे आले. ही धक्कादायक बाब असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंख्येला लागलेला अभिशाप आहे. नात्यात रक्त केल्याने रक्तगट एक होऊन त्यात एकसूत्रता येते, रक्ताचा गट एक झाल्यामुळे जन्माला येणारे मूल कर्णबधिर किंवा मतिमंद किंवा अंध किंवा अस्थिव्यंग किंवा बहुविकलांग असू शकते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कान, नाक व घसारोग विभागाने (इएनटी) १ महिन्यापासून ते ५ वर्षे वयोगटातील १४० कर्णबधिर बालकांचे सर्वेक्षण केले. त्यात नात्यात लग्न झालेल्या ६२ जोडप्यांच्या पोटी कर्णबधिर मुले जन्माला आली.
-अनुवांशिकतेमुळे ६ मुले कर्णबधिर
इएनटी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी सांगितले, आई किंवा वडील कर्णबधिर असतील तर मुलेही कर्णबधिर होण्याची शक्यता असते. विभागाने केलेल्या १४० कर्णबधिर मुलांच्या सर्वेक्षणात अनुवांशिकतेमुळे ६ मुले कर्णबधिर असल्याचे आढळून आले.
-कर्णबधिरतेमध्ये कमी वजनाची ३६ टक्के बालके
गुंतागुंतीची प्रसूती (हायरिस्क माता), जन्मोत्तर तीव्र कावीळ अथवा जन्मजात इतर कुठलेही व्यंग असलेल्या बालकांना जन्मजात श्रवणदोष होण्याची शक्यता असते. या सर्वेक्षणात कर्णबधिर असलेल्या मुलांमध्ये ३६ टक्के कमी वजनाची तर १७ टक्के बालके मुदतपूर्व प्रसूतीची होती.
-७० कोटी लोक होऊ शकतात कर्णबधिर
मेयोच्या इएनटी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे यांनी सांगितले, तरुणांमध्ये वाढत्या हेडफोनमुळे कर्णबधिरता येण्याची शक्यता वाढली आहे. हेडफोनमुळे येत्या काळात जवळपास २५० कोटी लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यातील जवळपास ७० कोटी लोक कर्णबधिर होऊन त्यांना कर्णयंत्राची मदत घेण्याची वेळ येईल.
-जन्मानंतर श्रवण चाचणी आवश्यक
जन्मजात बहिरेपण सहज लक्षात येणारा प्रकार नाही. जो काय दोष असतो तो अंत:करण असतो. तो दिसून येत नाही. शिवाय काही दुखत नसल्याने आणि मूल काही बोलू शकत नसल्याने बहिरेपणा ओळखता येत नाही. यामुळे जन्मानंतर प्रत्येक बाळाची श्रवण चाचणी आवश्यक आहे. वेळेत आजाराचे निदान झाल्यास उपचारातील यशाचा टक्का वाढतो.
-डॉ. जीवन वेदी, प्रमुख इएनटी विभाग, मेयो