कमलेश वानखेडे नागपूरअ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी विविध प्रश्नांवर देशभर फिरत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते व पदाधिकारी कमालीचे शांत आहेत . आताच काँग्रेसजण सक्रिय झाले नाही तर भविष्यातील संधीही गमावल्या जातील, याची जाणीव प्रदेश काँग्रेसला झाली आहे. याची दखल घेत शहर पातळीवरील नगरसवेक, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या कामांचे तिमाही आॅडिट केले जाणार आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या परफॉर्मन्सचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने शहर काँग्रेसला दिल्या आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काही कार्यक्रम आखले आहेत. मात्र, हे कार्यक्रम स्थानिक पातळीवर प्रभावीपणे राबविल्या गेले नाही तर काहीच उपयोग होणार नाही. नुकतीच काँग्रेसच्या शहर व जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक झाली होती. तीत काँग्रेस कशी मजबूत होईल व ज्यांना पक्षाने मोठे केले त्यांच्याकडून काँग्रेसला काय अपेक्षा आहे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ज्यांना पक्षाने पदे दिली, मोठे केले त्यांनी पडत्या काळात आता पक्षाला बळकट करण्यासाठी ताकद लावावी, अशी पक्षाची अपेक्षा आहे. यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे एक आचारसंहिता तयार केली जात आहे. शहर पातळीवर काँग्रेसची कुठलीही बैठक असो तीत काँग्रेसचे किती नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते याची यापुढे नोंद घेतली जाईल. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमांनाही काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक येत नाहीत, असे पक्षाला निदर्शनास आले असून यावर प्रदेश काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात कोण अनुपस्थित होते, पक्षाने दिलेला कार्यक्रम कुणी राबविला नाही याचा अहवाल दरमहा शहर काँग्रेसतर्फे तयार केला जाईल. पक्षाच्या निवडणुकीत कुणी फुटीर भूमिका घेतली, कुणी पक्षाच्या विरोधात मतदान केले, सत्तधारी भाजपला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेतली का, याची नोंदही या अहवालात केली जाईल. दरमहा तयार होणारा अहवाल एकत्र करून तिमाही अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्याची जबाबदारी शहर काँग्रेसवर सोपविण्यात आली आहे.काम न करणारे अध्यक्ष ‘ब्लॉक’शहर काँग्रेसमध्ये ब्लॉक अध्यक्ष हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे ब्लॉक अध्यक्षांच्याही कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. ब्लॉक अंतर्गत स्थानिक प्रश्नांसाठी किती व कोणती आंदोलने केली, नगरसेवक व पदाधिकारी यांच्याशी समन्वय कसा आहे, तेथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ब्लॉकमधील नगरसेवक, पदाधिकारी यांना सोबत घेऊन संयुक्त आंदोलने केली का, ब्लॉक अंतर्गत पक्षाचे कार्यक्रम किती प्रभावीपणे राबविले याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. या निकषांवर कमी पडणाऱ्या ब्लॉक अध्यक्षाला पदापासून दूर करून काम करणाऱ्याला संधी देण्याच्या सूचनाही प्रदेशकडून देण्यात आल्या आहेत.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कामांचे होणार आॅडिट
By admin | Updated: May 23, 2015 02:41 IST