धामणा : नागपूर शहरातील स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नजीकच्या सातनवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महिला आराेग्य प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. यात महिलांचे आजार, विविध समस्या, समज, गैरसमज यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सरपंच विजय चाैधरी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नसरीन अन्सारी यांनी मासिक पाळी, प्रजनन स्वास्थ्य यासंदर्भातील समस्या, गैरसमज, अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले. त्यांनी महिला व किशाेरवयीन मुलींशी मनमाेकळेपणाने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययाेजनाही सुचविल्या. अश्विन फुलेकर यांनी अस्मिता ॲपबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला स्थानिक व परिसरातील गावांमधील अंगणवाडी सेविका, आशासेविका, गराेदर माता, महिला, तरुणी, किशाेरवयीन मुली उपस्थित हाेत्या. संचालन प्रकल्प समन्वयक शाहू यांनी केले तर कविता भोयर यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी मनीषा गोतमारे, वर्षा मोरे, जयश्री तिमाने, सविता अनंतवार, वर्षा देशभ्रतार यांनी सहकार्य केले.