बाबा आढाव : सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्काराचे वितरणनागपूर : आज महिला व पुरुषांना समान दर्जा आहे. दोघांनाही मतदानाचा अधिकार आहे. महिला निवडणूकही लढवित आहेत. परंतु, पुरुषांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण फार कमी आहे. संसदेत बोटावर मोजण्याएवढ्या महिला खासदार आहेत. शिक्षणाचा उपयोग करण्यात महिला कमी पडत आहेत, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक कृतज्ञता निधी संकल्पनेचे जनक डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली. सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे रविवारी अमरावती रोडवरील सर्वोदय आश्रम सभागृहात तीन सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर प्रमुख अतिथी होते. चंद्रपूर येथील सत्यशोधक किसान मंचचे संस्थापक माजी आमदार एकनाथ साळवे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे येथील कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतच्या शैलजा आरळकर यांना एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार, तर मुंबई येथील कम्युनॅलिझम कॉम्बॅट मासिकाचे संपादक जावेद आनंद यांना डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्काराने गौरविण्यात आले. १० हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आदी मूल्ये आपण सर्वांनी स्वीकारून त्यांचा राज्यघटनेत समावेश केला आहे. परंतु, हीच मूल्ये आज काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण काय करीत आहोत, असा सवाल आढाव यांनी केला.मनोहर म्हणाले, भाजप सरकारात कुणी काय बोलावे हे ठरलेले आहे. हलकी डोकी बिघडविण्याचा कार्यक्रम सर्वत्र सुरू आहे. विचारशून्य लोकांवर याचा परिणाम होत आहे. देशात पोरकटपणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. देश झाडू मारून स्वच्छ होणार नाही. आधी डोक्यातील धर्मांधतेचा कचरा बाहेर काढला पाहिजे. आपल्याकडे विचारांची उणीव नाही पण, विचारांची चळवळ उभी करणाऱ्यांची मोठी कमतरता आहे. संविधानाचे संरक्षण गमावल्यास तुम्हाला वाचवायला आभाळही येणार नाही, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. शेखर सोनाळकर यांनी प्रास्ताविक तर, कार्यवाह सुभाष वारे यांनी संचालन केले. विश्वस्त विलास भोंगाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
महिलांनी शिक्षणाचा अधिकाधिक उपयोग करावा
By admin | Updated: February 9, 2015 01:00 IST