लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे समाजातील जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकाेन बदलला पाहिजे. स्त्रियांनाही पुरुषांच्या बराेबरीने दर्जा व अधिकार मिळणे गरजेचे आहे, असे मत न्यायाधीश विनोद डामरे यांनी व्यक्त केले.
भिवापूर तालुका विधी सेवा समितीच्यावतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात न्या डामरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भिवापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक खंडविकास अधिकारी राेशनकुमार दुबे, सरकारी अभियोक्ता कैलास कन्नाके, ॲड. प्रभाकर नागोसे, नरहरी पेंदाम, ॲड. योगिराज सुखदेवे आदींची उपस्थिती होती. मुलामुलींमध्ये भेदभाव करू नका. स्त्रियांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने नानाविध कायदे करण्यात आले आहेत, असेही न्या. डामरे म्हणाले. संचालन नरहरी पेंदाम यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश झोडे, अतुल राखडे, युवराज गडपायले, महेश श्रीवास, जे. एन. राखुंडे, आशिष गोगुले आदींनी सहकार्य केले.