लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सदर छावणी परिसरातील टेलर गल्ली येथील अनिल काटरपवार यांच्या मालकीच्या दुमजली निवासी व व्यावसायिक इमारतीमधील तळमजल्यावरील दुकानाला गुरुवारी सकाळी ११.२० च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथे सफाईचे काम करणाऱ्या लताबाई काटरपवार (वय ४५ ) या महिलेचा होरपळून मृत्यू झाला. आगीत फर्निचर, कार व किमती साहित्य नष्ट झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.
या इमारतीत अल्फाज अन्सारी याने तळमजल्यावर भाड्याने घेतलेल्या जागेत फर्निचरचे दुकान होते. याचा गोदामासारखा वापर केला जात होता. येथे रासायनिक पदार्थ असल्याची माहिती मिळाली; तर दुसऱ्या मजल्यावर फटाके ठेवले होते. यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. पहिल्या मजल्यावर अनिल काटरपवार वास्तव्यास आहेत. वरच्या माळ्यावर उरलेले फटाके ठेवले होते. आग लागली आणि एकच धावपळ सुरू झाली. फटाक्यांचे स्फोट होत होते. यामुळे परिसरात घबराट पसरली होती. घरातील लोक बाहेर पडल्याने बचावले. मात्र काम करणाऱ्या तलाबाई काटरपवार आत अडकून पडल्या. त्या आत असल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. यामुळे त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यात सिव्हील लाईन स्टेशन, सुगतनगर, कॉटनमार्केट व गंजीपेठ येथील स्टेशनच्या गाड्यांचा समावेश होता, अशी माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली.
ढिगारा हटविण्याचे काम सुरू असताना यात महिलेचा जळलेला मृतदेह आढळला. ही महिला दुकानात साफसफाईचे काम करीत होती. ती घरमालकाची नातेवाईक असल्याची माहिती मिळाली. याची माहिती सदर पोलीस ठाण्याला देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.