अशोक चव्हाण : ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चानागपूर : शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आदी सर्वच पातळीवर वर्षभरात सरकार अपयशी ठरले आहे. वर्षपूर्तीचे सोहळे साजरे करणाऱ्या सरकारला या सर्वबाबींचा अधिवेशनात व बाहेरही काँग्रेसतर्फे जाब विचारला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला. एकूणच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावल्याचे दिसून येत आहे.खा. चव्हाण बुधवारी यांनी दिवसभर काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोर्चासंबंधातील तयारीचा आढावा घेतला. यानंतर रविभवन येथे पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, दुष्काळी भागात पाणी आणि चारा टंचाई आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांवर तर इच्छामरण मागण्याची वेळ आली आहे. तरीदेखील राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ८ डिसेंबर रोजी आपल्या नेतृत्त्वात विधिमंडळावर मोर्चा काढला जाईल. दीक्षाभूमी परिसरातून सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होईल . यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील. मागण्यांचे निवेदन सरकारला दिले जाईल. कापसाला प्रति क्विंटल ८ हजार भाव देण्यात यावा, सोयाबीन व संत्रा उत्पादकांना सरकारने मदत करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. डाळीचे वाढलेले भाव, पडलेल्या धाडी, त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आलेली डाळ यात मोठा घोळ असल्याचा आरोप करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, प३देश सचिव रामकिशन ओझा प्रामुख्याने उपस्थित होते.
वर्षभरात सरकार फेल, जाब विचारणार
By admin | Updated: December 3, 2015 03:33 IST