रेवराल : रासायनिक खताच्या किमती दीडपटीने वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियाेजन बिघडले आहे. या दरवाढीमुळे पिकांचा उत्पादनखर्च वाढणार असल्याने तसेच शेतकरी आधीच आर्थिक संकटात असल्याने केंद्र शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्याकडे साेपविलेल्या निवेदनात केली आहे.
पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आवश्यक आहे. आधीच पिकांवर विविध किडी व राेगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने त्यांच्यापासून पीक वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर औषधे खरेदी करावी लागतात. त्यातच केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किमतीत दीडपटीने वाढ केली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी जीवघेणी असल्याने ती केंद्र शासनाने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव सुरेश भोयर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष युवराज ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्की साठवणे, नगरसेवक किशोर सॅंडल, बाजार समिती संचालक राजेंद्र लांडे, नगरसेवक शुभम तिघरे, राजेश ठवकर, राजेश निनावे, अशोक डडुरे, प्रकाश कावळे, विष्णू साठवणे, राजकुमार ठवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.