कारागृह शिपाई भरती : दोन वर्षांनंतर नव्याने अर्ज मागविल्याने उमेदवारांमध्ये संतापनागपूर : कारागृहात शिपाई (रक्षक) पदासाठी जानेवारी २०१४ मध्ये जाहिरात करण्यात आली. त्यावेळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिपाई (रक्षक) पदासाठी नागपूरच्या पात्र विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केला. फेब्रुवारी २०१६ पर्यंत कारागृह प्रशासनाने यावर कुठलाही विचार केला नाही. पण दोन वर्षांपूर्वी उमेदवारांनी केलेल्या अर्जाचा कुठलाही विचार न करता फेब्रुवारी २०१६ मध्ये पुन्हा नव्याने आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यात दोन वर्षांपूर्वी अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांचे वय पात्र वयापेक्षा जास्त झाल्याने उमेवारांमध्ये चिंतेचे वातावरण असून यापूर्वी केलेल्या अर्जांचा कारागृह प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. ३ फेब्रुवारी रोजी शासनाने नव्याने कारागृह शिपाई पदासाठी आॅनलाईन अर्ज मागविले. यापूर्वी ज्यांनी अर्ज केले त्यांनाही नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले. या दोन वर्षांत अनेक उमेदवारांचे वय पात्र वयापेक्षा जास्त झाल्याने ते अर्ज करू शकत नाही. यापूर्वी ज्यांनी अर्ज केले आहेत त्या अर्जांवर विचार न करता नव्याने अर्ज मागविणे हा अन्याय असल्याची भूमिका उमेदवारांनी घेतली आहे. २०१४ साली ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्यांचा प्राधान्याने विचार करावा आणि उमेदवारांची गुणवत्ता तपासून त्यांना संधी द्यावी, अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे. २०१४ साली नागपूर कारागृहातील शिपाई पदासाठी एकूण १४ हजार उमेदवारांनी अर्ज केले. त्याच वेळी औरंगाबाद आणि पुणे विभागांनीही अर्ज मागितले होते. पुण्याची भरती प्रक्रिया २०१४ सालीच पूर्ण करण्यात आली. औरंगाबादची भरती प्रक्रिया तब्बल दोन वर्षांनी २०१६ ला प्रारंभ करण्यात आली. पण नागपूर कारागृहाची भरती प्रक्रिया सुरू न करता जुन्या अर्जांचा विचारही करण्यात येत नसून नवीन अर्ज मागविले जात आहेत. हा नागपूरच्या उमेदवारांवर सरळसरळ अन्याय आहे. कारागृहाने दोन वर्षांपासून भरती न केल्याने अनेकांची वयोमर्यादा संपलेली आहे. आपल्याला न्याय मिळावा म्हणून पालकमंत्री, केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी पुण्याचे आय.जी. कार्यालय यांना निवेदन देण्यात आले; पण अद्याप न्याय मिळालेला नाही. जानेवारी २०१४ रोजी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यावेळच्या वयाप्रमाणे ग्राह्य धरून त्यांची भरती प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या उमेदवारांनी दिला आहे. (प्रतिनिधी)कारागृह भरती कधी करणार ?नव्याने जे अर्ज मागविण्यात आले त्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी आहे. पण नवीन अर्ज आम्हाला मान्य नाही. या पद भरतीसाठी वयोमर्यादा वाढविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती; पण त्याचाही जी.आर. अद्याप काढण्यात न आल्याने मुख्यमंत्र्यांच्या गावातील उमेदवारांवरच अन्याय होत आहे. २०१४ साली अर्ज केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात न आल्यास नवीन भरती होऊ देणार नाही, असा संताप सलमान शेख, सुमित मालोकेंद्रे, पंढरी काकड, उमेश जायबाय, पवन चंदुपुरंगे, सचिन ताजने, अनुप सारवे, मंगेश पाटील, कल्पना सोनटक्के, प्राची रंगारी, दीक्षा मेश्राम, मंगेश निंबार्ते, रोशन तांडेकर, प्रणाली रावले, प्रीती तोरणकर, चेतना गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
त्या उमेदवारांना न्याय मिळणार का?
By admin | Updated: February 11, 2016 03:20 IST