नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे क्षेत्राबाबत महत्त्वपूर्ण घाेषणा केली. यामध्ये त्यांनी भुसावळ-खरगपूर-डनकुणी या पूर्व-पश्चिम काॅरिडाेरची उभारणी करण्याच्या घाेषणेने लक्ष वेधले. हे नवीन काॅरिडाेर व्यापार-उद्याेगाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मानले जात आहे.
उद्याेग क्षेत्राचा मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी आणि व्यापाऱ्यांचा माल कमी वेळात निर्धारितस्थळी पाेहोचण्यासाठी पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण काॅरिडाेर उभारण्याची घाेषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यातील उत्तर-दक्षिण काॅरिडाेरअंतर्गत इटारसी ते विजयवाडा ब्राॅडगेज लाइनची घाेषणा यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी केली हाेती. त्याला जाेडून भुसावळ ते खरगपूर काॅरिडाेरची निर्मिती जून २०२२ पर्यंत करण्याचा उल्लेख अर्थमंत्री यांनी केला. पुढे हा मार्ग डनकुणीला मिळेल. इटारसी ते विजयवाडाप्रमाणे हा काॅरिडाेरसुद्धा नागपूरला जाेडून राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच जळगाव जिल्ह्यासाठीही ही घाेषणा महत्त्वाची आहे. पश्चिम बंगालचे खरगपूर हे औद्याेगिकदृष्टीने महत्त्वाचे शहर मानले जाते. त्यातच आयआयटीसारखी संस्था असल्यानेही शैक्षणिक ओळख आहे. सध्या या काॅरिडाेरचा उल्लेख व्यापाराच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. पण काॅरिडाेर तयार झाल्यास भुसावळ ते खरगपूर विशेष एक्स्प्रेस रेल्वे सुरू हाेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे जळगाव जिल्हा थेट पश्चिम बंगालशी जाेडला जाईल.
रेल्वेच्या राष्ट्रीय रेल्वे याेजना-२०३० अंतर्गत भुसावळ-खरगपूर काॅरिडाेरची घाेषणा अर्थमंत्र्यांनी केली. मात्र हा काॅरिडाेर कसा असेल, त्यासाठी बजेटमध्ये कितीची तरतूद करण्यात आली आहे, या मार्गावर विशेष रेल्वे सुरू हाेणार काय, भविष्यात आणखी काय सुविधा मिळेल, याबाबत सध्या तरी कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे या घाेषणेचा कितपत फायदा हाेईल, याबाबत तज्ज्ञांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. १.१० लाख काेटी रुपयांची भरीव तरतूद रेल्वे विकासासाठी केल्याने अपेक्षा मात्र वाढल्या आहेत.