नागपूर : अपघातामुळे डोक्याला जबर दुखापत होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयव दान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली. यामुळे दोघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.
जुगेश गोंडाणे (५४) यांचा २१ डिसेंबर रोजी मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ अपघात झाला. डोक्याला जबर मार बसला. तातडीने जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहत त्यांना ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. न्यूरो सर्जन डॉ. शैलेंद्र अंजनकर व क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. राजेश अटल यांनी तपासून तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतरही प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याचे निदान झाले. याची माहिती त्यांच्या पत्नी छाया गोंडाणे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली, सोबतच अवयवदान करण्यासाठी समुपदेशनही केले. त्या दु:खातही त्यांच्या पत्नी छाया व नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श ठेवला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात झेडटीसीसीच्या समन्वयिका वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. गुरुवारी सकाळी अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. दोन्ही मूत्रपिंड दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना तर दोन्ही बुबुळाचे दान माधव नेत्र पेढीला करण्यात आले. दात्याकडून यकृताचेही दान करण्यात आले होते. परंतु तपासणीअंती अवयव निरोगी नसल्याने दान होऊ शकले नाही.
- ४१ वर्षीय पुरुषाला जीवनदान
ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या व मूत्रपिंड निकामी झाल्याने अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या ४१ वर्षीय पुरुषाला गोंडाणे यांचे मूत्रपिंड दान करण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. एस. जे. आचार्य यांच्या मार्गदर्शनात डॉ. निनाद गावंडे, डॉ. संदीप देशमुख, डॉ. धनंजय बोकरे, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. कविता धुर्वे, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. नीता देशपांडे, डॉ. अनिता पांडे व डॉ. शैलेंद्र मुंधडा यांनी केली. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांचे विशेष सहकार्य मिळाले. मंजिरी दामले यांनी नातेवाईकांचे समुपदेशन केले.
-‘सुपर’मधील २२ वर्षीय मुलीवर मूत्रपिंड प्रत्यारोपण
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका २२ वर्षीय मुलीला गोंडाणे यांचे दुसरे मूत्रपिंड दान करण्यात आले. प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. अजित पटेल, डॉ. निखारे व डॉ. मीरज शेख आदींच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली. विशेष म्हणजे, ऑरेंज सिटी हॉस्पिटल ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मार्ग वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. जवळपास सात मिनिटामध्ये अवयव पोहचविण्यात आले.
-‘सुपर’मध्ये ९ वे कॅडेव्हर किडनी ट्रान्सप्लांट
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी ९ वे ‘कॅडेव्हर किडनी ट्रान्सप्लांट’ म्हणजे ब्रेन डेड रुग्णाकडून मिळालेल्या मूत्रपिंड अवयवाचे प्रत्यारोपण झाले. आतापर्यंत २०१७ मध्ये २, २०१८ मध्ये १, २०१९ मध्ये ५ तर २०२० मधील हे पहिले होते.