कौटुंबिक न्यायालयाचा निकालराहुल अवसरे नागपूरपहिल्या लग्नाची पत्नी हयात असताना एका पतीने केलेले दुसरे लग्न कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयाने व्यर्थ व निरर्थक ठरवले. याचिकाकर्ती महिला वकीलपेठ भागातील रहिवासी असून ती मेयो इस्पितळात परिचारिका आहे. तिने याचिकेत भानखेडा भागात राहणाऱ्या आपल्या पतीला, संगीता नावाच्या एका महिलेला आणि उंटखाना भागात राहणाऱ्या देवानंद नावाच्या इसमाला प्रतिवादी केले होते. कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या कलम ७ (ए)(बी) अंतर्गत तिने दुसरे लग्न व्यर्थ व निरर्थक जाहीर करण्यात यावे, १७ फेब्रुवारी २०१० रोजीचे विवाह प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली होती. याचिकाकर्त्या महिलेनुसार तिचे लग्न प्रतिवादी एकसोबत हिंदू रीतीरिवाजाने २८ मे १९९९ रोजी हनुमाननगर येथे झाले होते. तिला जुळ्या मुली आहेत. ३ जुलै २०१२ रोजी संगीता नावाच्या महिलेने तिला मेयो इस्पितळातील तिच्या कार्यालयात एक पत्र पाठविले होते. तुझ्या पतीसोबत माझे १७ फेब्रुवारी २०१० रोजी बुद्धनगर येथील चंद्रमणी पाली बुद्धविहार संस्थेत लग्न झाले आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. पतीने आपणास घटस्फोट न देता केलेले हे लग्न बेकायदेशीर आणि बोगस आहे, चंद्रमणी पाली बुद्धविहार संस्थेने दिलेल्या विवाह प्रमाणपत्राला कायद्यात किंमत नाही, ते निरर्थक आहे. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक दोन संगीता हिला हे बेकायदेशीर प्रमाणपत्र वापरण्यावर तसेच प्रतिवादी क्रमांक एकच्या नावाचा पती म्हणून वापर करण्यावर कायमचा मनाईहुकूम देण्यात यावा, असे याचिकाकर्तीने याचिकेत नमूद केले होते. याचिकाकर्त्या महिलेच्या पतीने न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले. लग्न केल्याचा दावा करणारी संगीता ही न्यायालयात हजर झाली. मात्र तिने उत्तरच दाखल केले नाही. देवानंद नावाचा इसमही न्यायालयात हजर झाला नाही. प्रतिवादी पतीने आपला संगीतासोबत कधीही विवाह झाला नाही. विवाह प्रमाणपत्र बनावट व बोगस आहे. याचिकाकर्तीसोबतच आपला विवाह झालेला आहे आणि आपणास दोन मुली आहेत, असेही त्याने उत्तरात स्पष्ट केले. न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करीत याचिका मंजूर केली आणि प्रतिवादी क्रमांक एक आणि संगीतामधील विवाह व्यर्थ व निरर्थक आहे, असे जाहीर केले. विवाह प्रमाणपत्रही बेकायदेशीर ठरवले.
पत्नी हयात, पतीने केलेले दुसरे लग्न निरर्थक
By admin | Updated: August 2, 2015 03:01 IST