लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव राेडवरील वळणावर बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
पुष्पा शिवाजी दिवटे (४५) असे मृताचे, तर शिवाजी यादवराव दिवटे असे जखमी पतीचे नाव आहे. दाेघेही भुलेवाडी (ता. पारशिवनी) येथील रहिवासी आहेत. त्यांना मुलगा हेमंत शिवाजी दिवटे (२८) हा नवनीतनगर, वाडी येथे राहात असल्याने दाेघेही मुलाकडे आले हाेते. त्यांची मुलगी रंजू गाेपाल बरडे यादेखील याच भागात राहात असल्याने रंजूने आई वडिलांना बुधवारी रात्री जेवणासाठी बाेलावले हाेते. जेवण आटाेपल्यानंतर दाेघेही एमएच-४०/बीझेड-१९९४ क्रमांकाच्या दुचाकीने हेमंतच्या घराकडे जायला निघाले.
दरम्यान, खडगाव राेडवरील वळणावर वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. यात दाेघेही जखमी झाले. पुष्पा यांच्या डाेके व कपाळाला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दाेघांनाही लगेच नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती पुष्पा यांना मृत घाेषित केले, तर शिवाजी यांच्यावर उपचाराला सुरुवात केली. धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळाहून पळून गेला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी करीत आहेत.