अशोक चव्हाण : पुढचा महाराष्ट्र काँग्रेसचाच नागपूर : राज्यातील भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. कापूस, सोयाबीन, धान व संत्राला भाव नाही. विरोधात असताना शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आज सत्तेत आहेत. परंतु वारंवार मागणी करूनही कर्जमाफीची मागणी मान्य करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. वर्षभरातच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र असंतोष असून पुढचा महाराष्ट्र हा काँग्रेसचाच असल्याचा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात येत्या ८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर विविध मागण्यांसाठी विशाल मोर्चा काढण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. याचा आढावा घेण्यासाठी देवडिया काँग्रेस भवन येथे शहर काँग्रेसतर्फे पदाधिकारी व प्रमुख कार्यक र्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विलास मुत्तेमवार, गेव्ह आवारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, अनिस अहमद, आमदार सुनील केदार, अमर राजुरकर, माजी आमदार यादवराव देवगडे, अशोक धवड, अनंतराव घारड, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी व्यासपीठावर होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य सरकारची उदासीनता आणि दुष्काळी उपाययोजनांचा अभाव यामुळे वर्षभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकार धनदांडग्यांचे असून सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. परंतु फसवणूक वारंवार होत नसते. एकदा-दोनदा होते, वारंंवार होत नाही. याची जाणीव जनतेलाही झाली आहे. बिहार विधानसभा व मध्य प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. ८ डिसेंबरच्या मोर्चा यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माणिकराव ठाकरे यांनी केले. प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच नागपूर शहरातील ज्वलंत १७ प्रश्न मार्गी लागावे. यासाठी मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी प्रस्ताविकातून दिली. महापालिकेतील भ्रष्टाचार, ओसीडब्ल्यूचा प्रश्न, भूमिगत मेट्रो, टँकरमुक्त शहर, महागाई, ५७२ व १९०० ले -आऊ ट धारकांचे प्रश्न, नासुप्र बरखास्त करावे, आदी मागण्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.यावेळी प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, उमाकांत अग्निहोत्री, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दीपक कापसे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, विशाल मुत्तेमवार, योगेश तिवारी, सुजाता कोंबाडे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, तानाजी वनवे, सुभाष भोयर, जयंत लुटे, रेखा बाराहाते, प्रेरणा कापसे, राजश्री पन्नासे, मनोज साबळे, अनिल मछले, बंडोपंत टेंभुर्णे यांच्यासह नगरसेवक व पक्षाचे पदाधिकार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)संविधानाला हात लावाल तर गप्प बसणार नाही केंद्र सरकारने संविधानाच्या मूळ गाभ्यात २२ बदल करण्याची योजना आखली आहे. परंतु देशात संविधानाच्या पलिकडे कोणीच नाही. संविधानाला हात लावल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही. झाडू मारून देश स्वच्छ होत नाही तर जोपर्यंत मनातली घाण जात नाही तोपर्यंत भारत स्वच्छ होणार नाही, असे मत चव्हाण यांनी मांडले.
कर्जमाफी का नाही ?
By admin | Updated: December 3, 2015 03:38 IST