मनपात संक्रमणाचा धोका : ऑनलाइन सभा असली तरी मुख्यालयात गर्दी होणारच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल २२६१ पॉझिटिव्ह आलेत. संक्रमणाला आळा घालण्यासाठी १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुढील काही दिवस बाधितांचा आकडा कमी होण्याची शक्यता नाही. मनपाची यंत्रणा कोविड नियंत्रणाच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे १९ मार्चला मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा ऑनलाइन असली तरी मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी होणारच. यातून संक्रमणाचा धोका आहे. असे असतानाही लॉकडाऊन कालावधीत सभागृहाचा आग्रह कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊन कालावधीत तीन ते चार महिने सभेला परवानगी दिली नव्हती. सध्या अशीच गंभीर परिस्थिती आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर महिना-दोन महिन्यांनी सभा घेतली तर विकासाला फार मोठा फटका बसेल अशी परिस्थिती नाही. सभा ऑनलाइन असली तरी नेटवर्कमुळे अनेक पदाधिकारी मनपा मुख्यालयात आपल्या कक्षात बसून सभेच्या कामकाजात सहभाग घेतात. तसेही ऑनलाइन सभेत नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडता येत नाही. नगरसेवक बोलायला लागले की त्यांना म्युट केले जाते. अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. ऑनलाइन सभेत समस्या मांडता येत नसल्याने ऑफलाइन सभागृह घेण्याला राज्य सरकारने अनुमती द्यावी, यासाठी पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
ऑनलाइन सभेमुळे मागील काही महिन्यांत सभागृहात नगरसेवकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली नाही. अनेकदा नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला की नेटवर्कची समस्या येते. चर्चेत सहभागी होता येत नाही. चुकीच्या निर्णयावर आक्षेप घेता येत नाही. कोविड संक्रमणाचा विस्फोट विचारात घेता सभा पुढे ढकलण्यात यावी. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सभा घेण्यात यावी, अशी काही नगरसेवकांनी मागणी आहे.
....
काेविड नियंत्रणाऐवजी सभागृहात यंत्रणा व्यस्त
महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोविड नियंत्रणात व्यस्त आहे. संक्रमणामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. त्यात सभागृहामुळे यंत्रणा याकामात व्यस्त राहील. अशा परिस्थितीत बाधितांची संख्या आणखी वाढली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.