धडधडणाऱ्या तोफा सत्तापक्षात : विरोधकांकडे आक्रमकतेचा अभावनागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्याने अनेक समीकरणे बदलली आहेत. त्याचे प्रतिबिंब विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे. एरवी विदर्भाच्या मुद्यांवर सरकारला भांडावून सोडणारे विदर्भातील नेते सत्ताधारी झाल्याने व विरोधी बाकांवर बसणाऱ्या विदर्भातील नेत्यांमध्ये आक्रमकतेचा अभाव असल्याने विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आवाज बुलंद करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते. गत १५ वर्षाचा कालखंड पाहिला तर या काळात विरोधी बाकावर असलेले भाजप आणि शिवसेनेचे विदर्भातील सदस्य विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारला भंडावून सोडत होते तर सत्ताधारी असल्याने विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना आक्रमक होताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे विधिमंडळातील विदर्भाचा आवाज हा विरोधकच बुलंद करीत असल्याचे चित्र निर्माण होत होते. त्यात विधानसभेत प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. विधान परिषदेत दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, नीलम गोऱ्हे हे विदर्भाबाहेरील सदस्य विदर्भाचे प्रश्न मांडत होते.सत्ता बदल झाल्याने सभागृहातील चित्रही बदलणार आहे. विदर्भाच्या धडधडणाऱ्या तोफा सत्ताधारी बाकांवर बसणार असल्याने त्या शांत होतील पण दुसरीकडे विरोधी बाकांवर बसणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आक्रमक नेत्यांचा अभाव आहे. विधानसभेत विदर्भातील विदर्भातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे ११ सदस्य आहेत. त्यापैकी दोन निलंबित आहेत. ९ सदस्यांमध्ये विजय वड्डेट्टीवार, आणि गोपाल अग्रवाल यांचा अपवाद सोडला तर कुणाचीही आक्रमकतेची पार्श्वभूमी नाही. सलग १५ वर्ष सत्तेत गेल्याने त्याचाही परिणाम सध्याच्या विरोधकांवर झाला आहे. यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या विदर्भातील एकमेव सदस्या आहेत त्या किती तग धरणार याकडेही लक्ष लागले आहे. एकूणच विदर्भाच्या भूमीत होणाऱ्या अधिवेशनात विदर्भातील समस्या आक्रमक मांडणारी फळीच विरोधी बाकांवर नसल्याने सत्ताधाऱ्यांचे फावले आहे. (प्रतिनिधी)
अधिवेशनात ‘विदर्भ’ मांडणार कोण?
By admin | Updated: December 4, 2014 00:45 IST