साहित्यविश्वात चर्चेला उधाण : औरंगाबादच्या सत्कार समारंभात व्यक्त केली खंत नागपूर : डोंबिवली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षयकुमार काळे हे बहुमताने निवडून आले. त्यांचा विजय ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्रात गडचिरोलीपासून पुण्यापर्यंत व बृहृन् महाराष्ट्रात भोपाळपासून हैदराबादपर्यंत त्यांना एकगठ्ठा मते मिळाली. असे असतानाही ‘विदर्भातील ज्या लोकांना मी जवळचे मानत होतो त्यांनीच मला या निवडणुकीत दगा दिला’, अशी खंत स्वत: डॉ. काळेंनीच व्यक्त केली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे औरंगाबाद येथे आयोजित सत्कार समारंभात त्यांनी जाहीररीत्या असे विधान केल्याने मराठी साहित्यविश्व स्तब्ध झाले असून काळेंशी दगाफटका करणारी ती व्यक्ती वा संस्था कोण असेल, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या समारंभाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, रंगनाथ काळे, भाष्यकार महेश खरात अशी सर्व दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यांच्यासमोर मनातील खंत व्यक्त करताना डॉ. काळे म्हणाले, ‘मला निवडणुकीची भीती वाटते. साहित्य संमेलनाची निवडणूक लढतानाही ती भीती मनात होतीच. कारण, निवडणूक हा माझा पिंड नाही. पण, या निवडणुकीने मला खूप काही शिकवले. किती माणसे आपल्या पाठिशी आहेत हे कळले. ज्या लोकांना मी जवळचे मानत होतो त्यांनीच मला या निवडणुकीत दगा दिला. मराठवाड्यामुळेच मी संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकलो’ (प्रतिनिधी) सोशल मीडियावर फिरतोय बातमीचा ‘स्रॅप शॉट’ डॉ. काळेंच्या या धक्कादायक विधानाला काही स्थानिक दैनिकांनी ठळक प्रसिद्धी दिली. त्या बातमीचे ‘स्रॅप शॉट’ सोशल मीडियावर व्हायरल होत अनेक साहित्यिकांच्या इनबॉक्समध्ये जाऊन पडले. आता ते अवघ्या महाराष्ट्रात पसरले असून डॉ. काळेंच्या एकूणच साहित्यिक योगदानाबद्दल काही शंकेचे कारण नसताना त्यांना कुणी व का म्हणून दगा दिला असावा, याची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमका इशारा कुणाकडे? डॉ. काळेंचे नुसते मताधिक्य पाचशेच्यावर आहे. विदर्भातूनही एकगठ्ठा मते त्यांना मिळाली आहेत. इथे कुणी दगाफटका केला असता तर त्याचा परिणाम मतांच्या टक्केवारीवर नक्कीच झाला असता. पण, तसे काही झाले नाही. तरीही डॉ. काळे असे विधान करीत आहेत तर त्या विधानाला अगदीच नजरेआड करता येत नाही. पण, त्यांचा नेमका इशारा कुणाकडे हे मात्र कळायला मार्ग नाही.
अक्षयकुमार काळे यांना कुणी दगा दिला?
By admin | Updated: January 9, 2017 02:56 IST