सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण जग सध्या कोरोना लसीच्या स्वागतासाठी सज्ज आहे. नव्या वर्षात येणाऱ्या प्रतिबंधक लसीकडे सर्वांचे लक्ष लागले अहे. मात्र, शहरातील ३७ टक्के डॉक्टरांनी विविध कारणे देऊन कोरोनावरील प्रतिबंधक लसीला स्पष्ट नकार दिला आहे तर, ६३ टक्के डॉक्टरांनी लस घेण्याची तयारी दर्शविली आहे. शहरातील चार मोठ्या इस्पितळांसह ‘आयएमए’च्या सदस्यांनी आपले वैयक्तिक मत ‘लोकमत’कडे नोंदविले. त्यातून हे धक्कादायक वास्तव समोर आले. लसीबाबत सावध भूमिका घेणाऱ्या डॉक्टरांनी त्याची कारणेही स्पष्ट केली आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी देश-विदेशात मिळून एकूण ३० वेगवेगळ्या लसी चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यात भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा मानवी चाचणीचा पहिला व दुसरा टप्पा नागपुरात झाला. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीलाही सुरुवात झाली आहे. हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जात अहे. पुण्याच्या‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा ‘कोविशिल्ड’ लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू आहे. ५० स्वयंसेवकांना दोन डोज देण्यात आले आहे. या दोन लसीसोबतच ‘फायझर’, ‘झायडस बायोटेक कंपनी’चे ‘झायकोव-डी’ व डॉ. रेड्डी लॅबची रशियन ‘स्पुटनिक’ लस भारतात येण्याची शक्यता आहे. परंतु या लसींबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. ‘लोकमत’ने यात पुढाकार घेऊन शहरातील चार मोठ्या इस्पितळांसह, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्या सदस्यांचे वैयक्तिक मत जाणून घेतले असता, ४० डॉक्टरांमधून २५ डॉक्टरांनी प्रतिबंधक लस घेण्यास होकार दिला आहे तर, १५ डॉक्टरांनी नकार दिला आहे.
-आपत्कालीन वापरासाठी लसीला तूर्तास परवानगी नाही
कोरोनावरील ‘लस’च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज ‘फायझर’ कंपनीपाठोपाठ ‘सिरम इन्स्टिट्यूट’ आणि भारत बायोटेक यांनी केले होते. या तिन्ही कंपन्यांच्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीने चर्चा केली. ‘कोरोना लस’च्या परिणामकारकतेच्या दाव्याला बळकटी देणाऱ्या तपशिलाची गरज असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. मात्र तिन्ही कंपन्यांनी हा तपशील सादर केलेला नाही. यामुळे तूर्तास परवानगी थांबविल्याचे समोर आले आहे.
ही आहेत नकाराची कारणे १. कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी फार कमी कालावधीची आहे.
२. या चाचण्या १० पेक्षा कमी महिन्यातील आहेत.
३. घाईघाईत विकसित केलेली ही लस आहे.
४. लसीच्या गुणवत्तेबाबत अद्यापही साशंक वातावरण आहे.
५. चाचण्यांचे निष्कर्ष अद्यापही समोर आलेले नाहीत.
६. कोविड झाल्यामुळे अॅण्टिबॉडीज वाढल्याने लस घेणार नाही.
-होकार देणारे डॉक्टर म्हणतात
१. भारतात दिली जाणार लस ‘आयसीएमआर’ तपासूनच ती नागरिकांना देणार आहे. यामुळे लसीबाबत खात्री आहे.
२. लसीची नियमानुसार तपासणी झाली आहे. कोरोनावर औषधोपचार नाही. यामुळे लस घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.