नत्थू घरजाळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : वाढत्या नागरीकरणामुळे शहरांमध्ये बालकांना सार्वजनिक उद्याने ही एकमेव हक्काची जागा शिल्लक राहिली आहे. परंतु, या उद्यानांपासून स्थानिक प्रशासनाला व लाेकप्रतिनिधींना फारसा महसूल मिळत नसल्याने प्रशासन त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे फारसे लक्षच देत नाही. याला रामटेक शहरातील राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज बालाेद्यानदेखील अपवाद नाही. येथील तुटलेले खेळण्याचे साहित्य बालकांसाठी धाेकादायक ठरत आहेत.
बालकांना मुक्तपणे खेळता यावे तसेच ज्येष्ठांना थाेडाफार व्यायाम करीत वेळ घालविता यावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाने रामटेक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन सार्वजनिक उद्यानांची निर्मिती केली असून, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाॅर्डातील उद्यानाचे काम सध्या सुरू आहे. कालंका मंदिर उद्यान बंद असल्याने तिथे कुणीही जात नाही. भगतसिंग व टिळक वाॅर्डातील उद्यानाची अवस्थाही जेमतम आहे. या सर्व उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. प्रशासनाने लाखाे रुपये खर्च करून या प्रत्येक उद्यानात मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या घसरपट्ट्यांसह इतर साधने लावली आहेत. शिवाय, ज्येष्ठांसह इतरांना विश्रांती घेण्यासाठी बाकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज बालाेद्यान हे शहरात माेक्याच्या ठिकाणी असल्याने येथे खेळायला येणाऱ्या बालकांची व फिरायला येणाऱ्या ज्येष्ठांसह इतर नागरिकांची संख्या माेठी आहे. या व इतर उद्यानांची याेग्य देखभाल व दुरुस्ती हाेत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. आतील खेळण्याची साधने तुटलेली आहेत. ती वेळीच बदलविण्याची तसदीही प्रशासनाने आजवर घेतली नाही. तुटलेली ही साधने बालकांच्या जीविताच्या दृष्टीने धाेकादायक बनली आहेत. याकडे पालिका प्रशासन लक्ष देईल काय, असा प्रश्नही पालकांसह ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
...
दारूच्या रिकाम्या बाटल्या
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज बालाेद्यानाची कित्येक दिवसांपासून साफसफाई करण्यात न आल्याने आत माेठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या उद्यानाकडे प्रशासनाने लक्ष नसल्याने आत दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्याचे दिसून येते. यावरून आत दारू पिणाऱ्यांचा वावर वाढल्याचे स्पष्ट हाेते. झाडांना व गवताला पाणी दिले जात नसल्याने तेही सुकायला सुरुवात झाली आहे. झाडांच्या वाळलेल्या फांद्या ताेडून त्याची विल्हेवाट देखील लावली जात नाही. उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार माेडकळीस आले आहे.
...
शहरातील सर्व सार्वजनिक उद्यानांची पाहणी करून त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जातील. उद्यानांच्या नियमित साफसफाईसाठी प्रत्येकी दाेन मजुरांची नियुक्ती केली जाईल. खेळण्याची साधनेही व्यवस्थित केली जातील.
- दिलीप देशमुख,
नगराध्यक्ष, रामटेक.