लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रीस, इजिप्त आणि रोम यांची जुनी संस्कृती नाहिशी झाली आहे, मात्र आपले अस्तित्व आजही टिकून आहे. देशातील अध्यात्मिकतेमुळे हे शक्य झाले आहे. जगाकडे नसलेले ज्ञान आपल्या पूर्वजांकडे होते. म्हणूनच जेव्हा जेव्हा जगावर संकट येते, तेव्हा भारतच मार्ग दाखवतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.
अतिशय क्षेत्र श्री आदिश्वर धाम, बाजारगाव येथील पंचकल्याणक महामहोत्सवाअंतर्गत तुलसीनगर येथे सुरू असलेल्या आयोजनादरम्यान ते बोलत होते. यावेळी सरसंघचालकांनी जैन मुनी आचार्य समयसागरजी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या दोघांनी विविध आध्यात्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चाही केली. वेळोवेळी अनेक समाज विविध वादळांमध्ये नष्ट झाले, पण आपण आपल्या अध्यात्मिकतेमुळे आणि ज्ञानामुळे टिकून राहिलो. याचे सर्व श्रेय आपल्या संतांना जाते. आपले संत आणि महात्मा हे आपल्या जीवनातील सुखाची हमी आहेत. अशा संतांची संगत सदैव टिकून राहो, अशी आपण प्रार्थना केली पाहिजे. जोपर्यंत आपला देश आहे, तोपर्यंत जगात सर्व काही ठीक राहील. कारण जर शरीर जग असले तर आत्मा आपला भारत देश आहे, असे ते म्हणाले.
आधुनिक भौतिकवाद, उपभोक्तावाद आणि भौतिकवाद ही समाजापुढील आव्हाने आहेत. त्यांच्या प्रभावामुळे अनेक समाज दुर्बळ होतात. परंतु संत आणि ऋषीमुनींच्या मार्गदर्शनामुळे भारत त्यांच्यापासून अप्रभावित राहिला आहे. आपल्या देशात संत, महात्मा आणि ऋषीमुनी समाजाला त्या दृष्टीनेच तयार करत आहेत. म्हणूनच तर भौतिकवाद आणि उपभोगवादाच्या वादळाने इतर समाज व संस्कृतींना उध्वस्त केले. परंतु अशी लाट आपल्यावरून निघून जाते आणि आपल्याला आहे तसेच सोडून जाते. हेच आध्यात्मिक ज्ञान आहे. म्हणूनच, आपण संतांच्या शिकवणींना आपल्या जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, कार्यवाह रवींद्र बोकारे, भाग संघचालक अरविंद आवड़े, नगर संघचालक जयपाल ढींगरा, भाग कार्यवाह महेश झा, पंकज मिश्रा, मनोज बंड, आनंद जैन, आशीष जैन उपस्थित होते.