लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळा, मंदिर, चित्रपट गृह यासह सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महापालिकेच्या आपली बसेस ६६ टक्के क्षमतेने धावत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
राज्यासह देशभरातील बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मात्र मनपाच्या ४३२ बसेस असताना सध्या २८५ बसेस धावताहेत. नियमानुसार उभ्याने प्रवास करण्याला निर्बंध आहे. बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना नाईलाजाने उभ्याने प्रवास करावा लागतो.
सत्तापक्षाचे नियंत्रण नसल्याने व प्रशासनाच्या तिजोरी भरण्याच्या धोरणामुळे आपली बस पूर्ण क्षमतेने सुरू नाही. सकाळी व सायंकाळी बस फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, तोटा वाढणार म्हणून बस सुरू करण्याला टाळाटाळ केली जात आहे.
कोरोना संक्रमणापूर्वी आपली बसधून दररोज १.५० ते १.६० लाख नागरिक प्रवास करीत होते. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २१९ दिवस बस सेवा बंद होती. त्यानंतर ६०बसेस सुरू करण्यात आल्या. टप्प्याटप्प्याने यात वाढ केली. परंतु अजूनही ३४ टक्के बसेस बंद आहेत. वास्तविक राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक यासह अन्य शहरात पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू आहे. सध्या २८५ बसेसमधून दररोज ७० ते ७५ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.
नागपूर शहरात शाळा ४ ऑक्टोबरला, मंदिरे ७ ऑक्टोबरला, चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरला सुरू करण्याला परवानगी दिली आहे. दुसरीकडे शहरातील बसची संख्या मात्र वाढविली जात नाही. यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
...
बससेवा पूर्ण क्षमतेने चालवावी - कुकडे
आपली बस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची अनेकदा मागणी केली आहे. पत्रव्यवहार केला. त्यानंतर काही बसेस वाढविल्या. परंतु आता बाजार, शाळा, मंदिर व सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे बस सेवा पूर्ण क्षेमतेने चालविण्याची गरज आहे. आयुक्तांनी तिजोरीचा विचार न करता लोकांच्या सोयीचा विचार करावा. कचऱ्यापासूनही मनपाला उत्पन्न नाही. पण खर्च करावा लागतो. दुसरीकडे बस तिकिटातून ४० टक्के उत्पन्न होते. अशी माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली.